Home Maharashtra चिमूर तालुक्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल देण्यावर बंदी!.‌‌…

चिमूर तालुक्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल देण्यावर बंदी!.‌‌…

शुभम गजभिये

    विशेष प्रतिनिधी

       चिमूर तालुक्यातील कोणत्याही पेट्रोल पंपावर आता बाटली,कॅन किंवा बॅरलमध्ये पेट्रोल अथवा डिझेल दिले जाणार नाही. 

        सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि इंधनाच्या संभाव्य गैरवापराला आळा घालण्यासाठी चिमूरचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्रीधर राजमाने यांनी आज कडक आदेश जारी केले आहेत. 

        तालुक्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

               तहसील कार्यालयाच्या अन्न विभागाने तालुक्यातील सर्व पेट्रोल पंप परवाना धारकांना यासंदर्भात अधिकृत पत्र निर्गमित केले आहे. 

       पेट्रोलियम कायदा १९३४ आणि पेट्रोलियम नियम २००२ नुसार पेट्रोल आणि डिझेलसारखे अत्यंत ज्वलनशील पदार्थ अनधिकृत कंटेनरमधून वाहून नेणे बेकायदेशीर व अत्यंत धोकादायक आहे. 

        अनेकदा नागरिक प्लास्टिकच्या बाटल्या किंवा उघड्या कॅनमध्ये इंधन घेऊन जातात. यामुळे आगीचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच,अशा प्रकारे साठवून ठेवलेल्या इंधनाचा गैरवापर किंवा आत्मदहनासारख्या गंभीर घटनांसाठी वापर होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.