सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठीचा प्रविणचा लढा समाजाला दिशा देणारा आहे : आमदार महेश लांडगे… — कर्तव्यनिधी म्हणून ५ लाख रुपयांचा धनादेश पिसाळ कुटुंबाला सुपूर्द…

दिनेश कुऱ्हाडे

   प्रतिनिधी

पुणे : सातारा जिल्ह्यातील प्रवीण पिसाळ या तरुणाने मराठा समाजासाठी संघटन करुन ‘वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली. त्या माध्यमातून समाजातील तरुणांना नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा दिली. वैद्यकीय, रोजगार आणि व्यवसायात मदतीसाठी पुढाकार घेतला. मात्र, प्रवीण पिसाळ यांचे नुकतेच अकाली निधन झाले. त्यामुळे समस्त मराठा समाजासह पिसाळ कुटुंबियांचे कधीही न भरून येणारे असे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पिसाळ कुटुंबियांच्या घरी भेट दिली आणि सांत्वन केले. तसेच, कर्तव्यनिधी म्हणून ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आणि पिसाळ यांची मुलगी शुभ्रा हिच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा मनोदय व्यक्त केला.

         प्रवीण पिसाळ यांनी मराठा समाजातील तब्बल एक कोटीहून अधिक तरुणांचे भक्कम संघटन उभे केले आहे. त्यांच्या संघटनकौशल्यामुळे महाराष्ट्रभर तसेच देश विदेशातील मराठी तरुणांनाही प्रेरणा व बळ मिळाले आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठीचा त्यांचा लढा समाजाला दिशा देणारा आहे. कोरोना काळामध्ये त्यांनी महाराष्ट्रभर केलेली मदत अविस्मरणीय आहे. कुणालाही कधीही कसलीही मदत लागली, तर प्रवीण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे पिसाळ कुटुंबियांच्या पाठीशी राहणे, हे आपले कर्तव्य आहे, अशा भावना आमदार लांडगे यांनी व्यक्त केल्या.

            महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वतः पाठपुरावा करीन आणि ज्या दिवशी ते साध्य होईल ती मराठा प्रवीण पिसाळ व त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली असेल. आमची प्रत्यक्ष भेट झाली नाही. पण, कोविड काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करण्याचा योग आला. एखादा तरुण समाजासाठी पुढाकार घेतो आणि अकाली निघून जातो, ही दुर्दैवी घटना आहे. यापुढील काळात पिसाळ कुटुंबियांसह मराठा समाजातील तरुणांना कोणत्याही अडचणीत मदत करण्यासाठी मी तत्परतेने प्रयत्नशील राहून समाजाच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे असे आमदार महेश लांडगे यांनी यावेळी सांगितले.