खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कैलास लिंभोरे तर उपसभापतीपदी विठ्ठल वनघरे विजयी…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक

पुणे : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती – उपसभापती पदासाठीची निवडणूक दि.24 रोजी पार पडली असून निवडणूक कार्यक्रम प्राधिकृत अध्यासी अधिकारी सचिन सरसमकर यांनी यावेळी काम पाहिले. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास लिंभोरे तर उपसभापती विठ्ठल वनघरे यांची निवड करण्यात आली.

             आमदार मोहिते पाटील यांच्या मार्गर्शनाखाली कैलास लिंभोरे, विठ्ठल वनघरे यांनी अर्ज दाखल केले. तर विरोधी गटाच्या माध्यमातून शिवसेनेचे विजय शिंदे, भाजपचे सुधीर भोमाळे यांनी अर्ज दाखल केले. कोणीही माघार घेतली नाही. अखेरीस मतदान होऊन निवड प्रक्रिया पार पाडावी लागली. यावेळी लिंभोरे आणि वनघरे यांना ११ तर शिंदे आणि भोमाळे यांना ७ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास लिंभोरे सभापतीपदी तर उपसभापतीपदी विठ्ठल वनघरे हे विजयी झाल्याचे निवडणूक कार्यक्रम प्राधिकृत अध्यासी अधिकारी सचिन सरसमकर यांनी यावेळी जाहीर केले.

          खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक झाली.१८ संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या गटाने १० जागा जिंकून विजय मिळवला, तर सर्व पक्षीय पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले आणि दोन अपक्ष विजयी झाले त्यातील एक आमदार मोहिते यांचे गटात दाखल झाला आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा बाजार समितीत एक हाती सत्ता घेतली.

       यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेखा मोहिते, अनिल राक्षे, अरुण चौधरी, विनायक घुमटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर, बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलाल भंडाऱ्याची उधळण करीत आनंद साजरा केला.