Home Maharashtra श्रेय घेत असाल तर या प्रकरणाचा सुगावा का लागला नाही? मुख्यमंत्री देवेंद्र...

श्रेय घेत असाल तर या प्रकरणाचा सुगावा का लागला नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरेंचे खडेबोल…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

        नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यावरून महाराष्ट्रात खळबळ उडाली असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियात एक पोस्ट केली आहे.ज्यामध्ये राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर निशाना साधला आहे. 

        त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे कि मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला.जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे,तेव्हा याचा कुठेच सुगावा का लागला नाही,असा थेट सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला आहे.

            अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून शब्दशः गरगरल्यासारखं झालं.काही दिवसांपूर्वी आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. 

         मात्र याच महाराष्ट्रात अशोक खरातसारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र’ हा प्रश्न पडतो. त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन अजब तीर्थ प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

         महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं.त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि या प्रकरणात अडकले असतील.हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.

         खरात स्त्रियांचं शोषण करतोय,ते झालं तरी चालेल,पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही.

         आधी आमदार, खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड.मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते,मग मंत्रिपद.ते नाही मिळालं तर शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड.मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं,मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड.आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात,तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. 

       यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे.या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे.हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात.

         राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे,तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही,असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. 

        माझ्या कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे.याचा अर्थ एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ कुरघोड्या थांबवल्या की सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल.अशी भीतीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

        आज महाराष्ट्रात स्त्रियांच्या शोषणाच्या घटना सर्रास घडत आहेत.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी धोबीपछाड राजकारण बाजूला ठेऊन या प्रकरणाचा छडा लावा.याला वेळीच आवर नाही घातला तर महाराष्ट्राचं वाटोळं झालं म्हणून समजा.

          तेंव्हा या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा,त्यांना ठेचून काढा.तरच तुमच्या भाषणांत तुम्हाला संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे. अन्यथा नाही,असा चिमटाही राज ठाकरे यांनी फडणवीसांना काढला.