राजू झोडे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा बांधकाम विभागाने घेतला धसका… — सोमवार रात्री पासून बल्लारपूर-राजुरा मार्गाचे काम होणार सुरू…

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

             चंद्रपूर जिल्ह्यातील अतिमहत्वाचा रस्ता असलेला बल्लारपूर राजुरा मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत तर वर्धा नदीवर जीवघेणे खड्डे पडले असून अनेक अपघात होऊन अनेकांचा जीव गेला. रस्त्यावरील खड्डे बुजवून वर्धा नदीवरील पुलाला कठडे बसवा अन्यथा खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून रस्ता रोको आंदोलनाचा इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला होता. या आंदोलनाचा बांधकाम विभागाने चांगलाच धसका घेतला असून आज सोमवारी रात्री11 वाजेपासून मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या मार्गाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

          राजुरा बामणी मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावर नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. चार वर्षाच्या मुलाला चॉकलेट घेऊन देण्यासाठी दुचाकीनं निघालेल्या गर्भवती आईचा पुलावरून तोल गेला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा रात्रभर मृत आईसोबत टाहो फोडत असल्याची घटना नुकतीच समोर आली. सुषमा पवन काकडे असे या मृत महिलेचं नाव आहे. या पुलाला कठडे असते तर महिलेचा जीव नक्कीच वाचला असता. तर पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून दुचाकीवरील तोल गेल्याने ही धक्कादायक घटना घडली आहे.

       त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित विभागाने तात्काळ या मार्गावरील खड्डे बुजवावे व वर्धा नदीवरील पुलाला कठडे बसवावे अन्यथा खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून तीव्र आंदोलन करू असा गंभीर इशारा राजू झोडे यांनी दिला. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर बांधकाम विभागाने आता सोमवारी रात्रीपासून या मार्गाचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. तर वाहतूक विभाग व संबंधित विभागाने अपघात रोखण्यासाठी कठोर पावले उचलावे अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे.