दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे – अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री खंडेरायाच्या पवित्र जेजुरी नगरीत मंगळवार, दि. २४ रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर, पालखी सोहळा पुढील दिवशी (दि. २५) वाल्हे नगरीकडे मार्गस्थ होणार असून, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दौंडज खिंडीत थांबा घेऊन हा प्रवास सुरू होतो.
परंतु, अलीकडील काही दिवसांपासून दौंडज खिंडीत लोहमार्गाच्या बाजूस मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाळ्यात या कचऱ्यामुळे दलदलीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून, गवत वाढल्याने डास व माशांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया व इतर संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
वारी दरम्यान या खिंडीत अल्प विश्रांतीसाठी थांबणाऱ्या हजारो वैष्णवांच्या आरोग्याला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनाच्या लक्ष वेधले आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत व वारीच्या पवित्रतेचा आदर ठेवत या पवित्र मार्गावर स्वच्छतेचे काम तात्काळ हाती घेण्याची मागणी करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायाच्या आरोग्याची आणि निसर्गसंवर्धनाची जपणूक ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे मत अनेक सामाजिक संस्थांनी व्यक्त केले आहे.
दौंडज खिंड ही केवळ एक विश्रांतीची जागा नसून, ती सह्याद्रीच्या साक्षीने भगव्या पताकांचा साक्षात्कार घडवणारी पवित्र जागा आहे. त्यामुळे ती स्वच्छ, रोगमुक्त आणि स्वागतशील ठेवण्याचे आवाहन आता जनतेतून जोर धरू लागले आहे.



