दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेची जबाबदारी यंदाही ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ आणि ‘सुवर्णयुग तरुण मंडळ’ यांनी उचलली आहे. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत तीन सुसज्ज रुग्णवाहिका पुण्यातून पालखी मार्गावर रवाना करण्यात आल्या आहेत.
या उपक्रमाची सुरुवात दगडूशेठ गणपती मंदिरासमोर रुग्णवाहिकांचे विधिवत पूजन करून झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र ऊर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, आमदार व सरचिटणीस हेमंत रासने, तसेच ज्ञानेश्वर रासने आदी मान्यवर उपस्थित होते. उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा या सेवाभावी उपक्रमाचे ३६ वे वर्ष आहे.
उपक्रमाअंतर्गत पालखी सोहळ्याच्या प्रत्येक मुक्कामी फिरता दवाखाना कार्यरत राहणार आहे. त्वचा रोग, कान-नाक-घसा, नेत्र तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी यांसारख्या अनेक चाचण्या विनामूल्य केल्या जातील. डॉक्टरांची टीम आणि आवश्यक औषधांची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध असून, हजारो वारकरी दरवर्षी या उपक्रमाचा लाभ घेतात. आरोग्य सेवा, श्रद्धा आणि सेवा यांचे हे अनोखे सूत्र जपणारा ‘जय गणेश रुग्णसेवा’ उपक्रम हे वारकरी चळवळीतील एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.



