Home Social आई-वडिलांचे आशीर्वाद हेच मुलांच्या प्रगतीचे खरे बळ :- नगरसेविका ऋतुजा घुंडरे… ...

आई-वडिलांचे आशीर्वाद हेच मुलांच्या प्रगतीचे खरे बळ :- नगरसेविका ऋतुजा घुंडरे… — ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत मातृ–पितृ पूजन सोहळा…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी : आई-वडिलांचे आशीर्वाद हेच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खरे प्रेरणास्थान आहे. मुलांची सर्वांगीण प्रगती ही त्यांच्या संस्कारांवर अवलंबून असते. त्यामुळे पालकांनी मुलांशी संवाद साधत त्यांना वेळ देणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन नगरसेविका ऋतुजा घुंडरे यांनी केले.

            श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर प्रशालेत मातृ–पितृ पूजनाचा संस्कारक्षम सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा ह.भ.प. भाग्यश्री भाग्यवंत होत्या. यावेळी नगरसेविका ऋतुजा घुंडरे, नगरसेवक सुरेश झोंबाडे, माजी विद्यार्थी व रोबोटिक्स अभियंता नितीश साळुंखे व परिवार, संस्थेचे सचिव अजित वडगावकर उपस्थित होते. मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी प्रास्ताविकात शालेय शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थिनी ईश्वरी ढगे हिने मातृ–पितृ पूजन हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचे सांगितले.

           नगरसेविका ऋतुजा घुंडरे म्हणाल्या, आई-वडिलांचे आशीर्वाद हेच मुलांच्या आयुष्याचा आधारस्तंभ असतात. पालकांनी मुलांशी विविध विषयांवर चर्चा करावी, त्यांना धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना घेऊन जावे आणि एकत्र वेळ घालवावा. संस्कार आणि संवाद यामुळेच मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होते.

           नगरसेवक सुरेश झोंबाडे यांनी आईच्या सेवेसाठी सरकारी नोकरी सोडल्याचा अनुभव सांगत पालकसेवेचे महत्त्व पटवून दिले. संस्कार, कृतज्ञता आणि प्रेमाचा संगम घडविणारा मातृ–पितृ पूजन सोहळा उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी भावना संस्था सचिव अजित वडगावकर यांनी व्यक्त केली.

           विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना कुमकुम तिलक करून हार अर्पण केला, त्यांच्या पायांवर मस्तक ठेवून सेवा करण्याचा संकल्प केला. पालकांनीही मुलांना आशीर्वाद देत भावनिक क्षण अनुभवले. सूत्रसंचालन राहुल चव्हाण व आरती गावडे यांनी केले. वैशाली शेळके यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेस शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.