Home देशविदेश राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि परिवर्तन:- दत्ता तुमवाड गाढे अभ्यासक नांदेड..‌

राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि परिवर्तन:- दत्ता तुमवाड गाढे अभ्यासक नांदेड..‌

       आज संत गाडगेबाबा जयंती निमित्त बाबांना विनम्र अभिवादन करून थोडेसे चिंतन करतो.

        माणसाच्या जीवनात काही अनुभव येतात,परंतु अनुभवातून जी माणसे शिकतात,ती बदलतात,किंवा त्यातून काही तरी नवीन निर्मिती करतात,ज्या समस्यांना तोंड द्यावे लागले किंवा तोंड देतात,त्यावर उपाय शोधतात,किंवा दाखवतात.

         पुढच्यास ठेच मागचा शहाणा,किंवा स्वतः जे अनुभवलं त्यातून शिकणे किंवा त्याला पर्याय देणे,असे कार्य करणारे माणसे फारच कमी असतात,त्यापैकी एक थोर संत गाडगेबाबा.

         घरची परिस्थिती चांगली होती,पण वडिलांनी सारा पैसा दारूवर आणि मोठेपणा मिरवण्यात खर्च केला.बरेच श्रीमंत लोक श्रीमंतीचे प्रदर्शन,बडेजावपणा,मी श्रीमंत आहे,हे दाखवण्यासाठी मोठमोठ्या जेवणाच्या पंगती घालतात,अनेकाना फुकट दारू पाजतात,स्वतः पितात,मोठ्या प्रमाणात दानधर्म करतात.लोकांना पैसे देतात,परत घेत नाहीत.

       मौत लग्न,जत्रा यात्रा,भंडारे यासाठी भरपूर पैसा खर्च करतात,या कामासाठी इतरांनाही मदत करतात,या उधळपट्टीमुळे श्रीमंत माणसे गरीब होतात.याच कारणाने गाडगेबाबाचे वडील श्रीमंतीतून गरिबीत आले.

          लहान पानापासून गाडगेबाबांनी हे पाहिले,अनुभवले,दारू पिऊन वडील आईस कसा त्रास देत होते,तोही अनुभवले.

          मूलतःच गाडगेबाबा विचारशील आणि संवेदनशील होते.म्हणून या अनुभवातून बाबा शिकले,आणि आपल्या कुटुंबावर जी पाळी आली,असे जीवन इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून जनतेस उपदेश करण्याचा संकल्प केला.

         कारण ” जे जे आपणाशी ठावे,ते ते इतरांशी सांगावे,शहाणे करावे सकलजन..‌‌ ” 

            या संताच्या शिकवणुकीचा उपदेशाचा बाबांनी अंमल केला.संतांची शिकवणूक देता देता ते स्वतःच संत झाले.पण देव धर्म भक्ती पंथाचे संत झाले नाहीत,तर ते राष्ट्रसंत झाले.

         साऱ्या जनतेनी आणि शासनानी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली.कारण बाबा कीर्तनातून,भजनातून सांगायचे की,देव दगडात नसून आत्म्यात आहे,म्हणून जनसेवा हीच ईश्वरसेवा होय,देवभक्ती ऐवजी राष्ट्रभक्ती करा,देशाचा विकास करून देश सुजलाम सुफलाम संपन्न करा.

         भारताचे नाव जगात गाजवा.श्रीमंताला श्रीमंत करण्यापेक्षा राष्ट्राला श्रीमंत करा,तरुण प्रौढांनी दारु पिऊन संसार उध्वस्त करु नका,दारू पिऊन बायकोला मुलांना मारू नका,गावात भांडण तंटे करू नका.असा उपदेश बाबा कीर्तनातून करीत असत.

       तीर्थयात्रा करा,देवळात जा,देवाला नैवेद्य दाखवा,नवस करा,उपवास करा,पोथीपुरान वाचवा,सप्ताह करा,भंडारे करा,असे ते सांगत नसत,उलट असे केल्याने काहीच हाती लागत नाही.लाभ मिळत नाही,उलट या धार्मिक कार्यामुळे माणसाचा अमूल्य वेळ,कामधंदा,पैसा खर्च होतो, तो वाया जातो.असे ते सांगत असत.अशी धार्मिक कार्य करण्याने पुण्य मिळत नाही.

         तर पुण्य मिळवायचे असेल,आणि खरीच ईश्वरभक्ती करायची तर,आत्मा हाच परमेश्वर मानून,माणसाची सेवा करा,त्यास मदत करा.सहकार्य करा.कारण आत्मा हा प्रत्येकात असतो.म्हणून जनसेवा हीच ईश्वरसेवा आणि ईश्वरसेवा म्हणजेच अंधश्रद्धा होय.

          बाबा चे कीर्तन हे प्रश्न रुपी आणि संवादी होते.बाबा कीर्तनात श्रोत्यांना विचारीत की ” तुमचा देव कुठे आहे ? लोक म्हणत ” देवळात “. अरे देवळात तर मूर्ती आहे,दगडाची किंवा धातूची,दगड देव कसा ? उत्तर द्या.” लोकांना उत्तर येत नसे.गप्प बसत.तुमच्या देवाला तुम्ही वस्त्र देता,ते त्यास नेसता येत नाही,जेवण देता,तो खात नाही,तरी का देता ? ही अंधश्रद्धा आहे,चुकीचे आहे.हेच वस्त्र,अन्न,पाणी,पैसे,सोने जर एखाद्या गरीबाला द्याल तर तो बदल्यात तुम्हाला आशीर्वाद तरी देईल,त्याचा आत्मा शांत होईल,त्यास सुख समाधान आनंद मिळेल,यामुळे तुमच्या खात्यात पुण्य जमा होईल.

          दगडाच्या देवाला म्हणजे ज्याला विचार भावना नाहीत अशा देवाला दान देण्यापेक्षा चालत्यबोलत्या माणसाला, गरिबाला जर दान दिलात,त्यांच्या समस्या अडीअडचणी-सोडविली,तर तेच दान तेच पुण्य तीच ईश्वरसेवा होय.

        याचा अर्थ गाडगेबाबांनी धर्मशास्त्रात आणि क्षेत्रात एक परिवर्तन घडविले,ते म्हणजे देव धर्म पुण्य पाप याची व्याख्याच बदलून टाकली.अर्थच बदलून टाकला.दगडाला देव म्हणायचे नाही,आणि त्यास नवस बोलायचे नाही..याबरोबरच श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणजे काय ? त्यातील फरक बाबांनी स्पष्ट केला.

           बाबाचे मन हळवे होते,संवेदनशील होते,म्हणून दया माया प्रेम हे गुण त्यांचे अंगी होते.ज्यांना संवेदनाच नसतात,विचार पण नसतात,ती माणसे दिसायला माणसे असली तरी सजीव दगडच असतात.अशा व्यक्तींच्या देहात फक्त जीव असतो,आणि हाडं मासाचे शरीर असते,पण त्यात मन विचार नसतात.म्हणून अशी माणसे म्हणजे चालत्या बोलत्या भावल्या च समजाव्या.

      बाबांना विचार आणि मन होते,पण विचारांपेक्षा अधिक मनाने प्रभावित होते.व्यवहारात विचारांपेक्षा मनाला अधिक महत्व देत होते,असे मला वाटते.

        ते विचारशील ऐवजी संवेदनशील अधिक होते.संवेदनशील माणसे अधिक भावनाशील असतात,म्हणून दया माया क्षमा प्रेम उदारता उदात्तता हे गुण त्यांच्यात असतात.

          म्हणून कोणत्याही समस्येवर तोडगा उपाय शोधताना,काढताना त्या समस्यावर तातडीची उपाय योजना करीत असतात.तातडीचा उपाय केल्याने त्यांना समाधान मिळते.परंतु विचारशील माणसे कोणत्याही समस्यावर वरवरचा उपाय न करता,त्या समस्यांचे मूळ शोधतात,आणि त्या मुळावरच घाव घालून ती समस्या कायम निकाली काढतात.

        समस्यांवर वरवरच्या मलमपट्ट्या केल्याने रोग दुरुस्त होत नाहीत,त्यासाठी रोगाची लक्षणे म्हणजे कारणे शोधावी लागतात,आणि त्या कारणावर इलाज उपाय करावा लागतो.म्हणून निदान महत्वाचे आहे.

         संवेदनशील माणसांना निदान जमत नाही.त्यासाठी विचारशील माणसेच निदान करू शकतात आणि उपाय पण शोधू शकतात.

         बाबा भुकेलेल्यांना अन्न द्या म्हणतात,पण तो भुकेला का आहे ? हे शोधत नाहीत,त्याची कारणे सांगत नाहीत.आणि भुकेलेल्या माणसांची देशात जगात एकूण किती संख्या आहे,त्यांची ही समस्या कायमची कशी सोडवावी,हे सांगत नाहीत.

        याच प्रमाणे तहानलेल्यास पाणी,निर्वस्त्रास वस्त्र,औषधी मिळेनात त्यास औषधी,शिक्षण नाही त्यास शिक्षण द्या असे म्हणतात.पण ज्यांच्याकडे आहे,अशा ‘ आहेरे ‘ वर्गाने ज्यांच्याकडे नाही अशा ‘ नाहीरे ‘ वर्गास मदत करावी,म्हणजे एक प्रकारे भीक द्यावी,असाच त्याचा अर्थ होतो.

           पण यांना भीक देण्याची कींव मागण्याची पाळी का यावी ? यावर गंभीरपणे बाबांनी विचार केलेला दिसत नाही.केला असेल तर तसे ते बोलले नाहीत.किंवा त्यानुसार कृती केली नाही.याचा अर्थ माणसाच्या ज्या महत्त्वाच्या दोन समस्या आहेत,त्या म्हणजे गरिबी आणि श्रीमंती,याची कारणे शोधून या दोन गोष्टींचे जे दुष्परिणाम जे मानवी जीवावर होताहेत,त्यावर उपाय शोधणे जरुरीचे आहे.

       अन्यथा दयापोटी,सेवा म्हणून,पुण्य म्हणून कुठे कुठे अशी मोजकी कामे,आदर्श,प्रकल्प,उदाहरणे दाखवून किंवा देऊन परिवर्तन होत नाही.

        बोटावर मोजण्या एव्हढ्या लोकांचे प्रश्न समस्या सोडणे तेही श्रीमंतांच्या मेहरबानी ने,ही पद्धत आमूलाग्र बदल घडवून आणू शकत नाही.

        म्हणून बाबा गाडगे काय,किंवा बाबा आमटे काय ,यांची कामे कार्य म्हणजे केवळ पथदर्शी कार्यक्रम आहेत.समस्यावर उपाय होऊ शकत नाहीत.शिवाय अशी सेवाभावी कार्य हे टिकाऊ नसतात,परावलंबी असतात,दुसऱ्यांच्या भिकेवर,दयेवर अवलंबून असतात. 

       अशी कार्य ही जो माणूस करतो,तो संपला की,त्याचे कार्य पण संपते.टिकाऊ नसते.

        समस्याग्रस्त लोकांनी स्वावलंबी जीवन,आत्मनिर्भर जीवन,स्वाभिमानी जीवन ,निर्भय जीवन जगले पाहिजे,असे उद्दिष्ट कोणत्याही कार्याचे पाहिजे.

        अडचणीत असलेल्या लोकांना केवळ पोटाला पोटभर निकृष्ट अन्न देऊन,लोकांचे जुने कपडे चादरी देऊन त्यांना भिकारीच ठेवण्यापेक्षा त्यांना संघटित करणे,जागृत करणे,संघर्ष करणे,त्यांचे प्रश्न त्यांनीच सोडवावेत अशी क्षमता त्यांच्यात निर्माण करणे,असे कार्य हेच परिवर्तनकारी कार्य समजावे,नव्हे होय.

        अन्यथा केवळ भावनेचा भरात येऊन आपल्या संवेदना जाग उन केवळ दयापोटी जनसेवा हीच ईश्वरसेवा करीत राहणे म्हणजे परिवर्तनाचे चक्र थांबविणे होय.

      टीप: दुष्ट लोकांपेक्षा बाबांचे कार्य सेवा नक्कीच श्रेष्ठ आहे,त्यांचे अंधश्रद्धेचे कार्य महान आहे,ते राष्ट्रसंत आहेत,त्यांच्याबद्दल आदर जोपासूनच हा लेख लिहिला आहे,बाबांच्या जयंती निमित्त परिवर्तन म्हणजे काय ? यावर वाचकांनी चर्चा करावी,या उद्देशाने हा लेख लिहिला आहे.कृपया कुणीही गैरसमज करून घेऊ नये.?

   लेखक : दत्ता तुमवाड

     सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक: 23 फेब्रुवारी 2026,फोन: 9420912209.