शंकरपटाची सांगता,लखन व जलवा जोडी ठरली अव्वल.. — गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक,अखेरच्या दिवशी धावल्या 100 पेक्षा अधिक जोड्या..

     रोहन आदेवार

साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी..

        यवतमाळ/वर्धा 

वणी – शहरातील जत्रा मैदानावर 22 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता विदर्भ केसरी शंकरपटाची सांगता व बक्षिस वितरण कार्यक्रम पार पडला. 

      पटाच्या तिस-या दिवशी 100 जोड्या धावल्या.यात अ गटात करोडी येथील मनोहर पाटील चव्हाण यांची लखन व जलवा ही जोडी पहिली ठरली.या जोडीने 6.54 सेकंदात अंतर कापत 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले. 

       तर क गटात दहिवड येथील कु.भव्या अमोल पवार यांची जलवा व सैराट ही जोडी विजेती ठरली.या जोडीने 6.79 सेकंदात अंतर कापत 41 हजारांचे रोख पारितोषिक पटकावले.बक्षिस वितरण कार्यक्रमाला आ.प्रतिभा धानोरकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.अखेरच्या दिवशी 40 हजार पेक्षा अधिक लोकांनी या शर्यतीचा थरार अनुभवला.

          अ गटात दुसरे बक्षिस हिवरा येथील साहेबराव पाटील यांच्या लक्ष्या व राणा या जोडीने,तिसरे बक्षिस धारफळ येथील अशोकराव पाटील यांच्या बजरंग व वंशी या जोडीने पटकावले.

       क गटात दुसरे बक्षिस वडगाव येथील नवनाथ महाराज प्रसन्न यांच्या हिरा व शिवा जोडीने तर घोंगशी कांडा येथील राम चव्हाण यांच्या बलमा व नंद्या या जोडीने तिसरे बक्षिस पटकावले.या दोन्ही गटात पहिल्या येणा-या 13 शेतक-यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस देण्यात आले. 

      बक्षिस वितरण समारंभात बोलताना आ.प्रतिभा धानोरकर यांनी शंकरपट हा शेतक-यांना आनंद देणारा खेळ असून अनेक वर्षांनंतर हा खेळ सुरु झाल्याने बळीराजाच्या चेह-यावर समाधान दिसून येत असल्याचे मनोगत व्यक्त केले.

       आयोजक संजय खाडे यांनी हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानत यापुढेही कायम अशा स्पर्धा,खेळ भरवण्यात येईल,अशी ग्वाही दिली.

        परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार या शंकरपटा दरम्यान वणी विधानसभा क्षेत्रातील राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक,आर्थिक,खेळ,कला,पत्रकारिता,उद्योजक्ता,महिला सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रातील कार्यातून समाजासाठी योगदान देणा-या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे सदस्य व संजय खाडे मित्र परिवारातील शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.