दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी नगरपरिषद निवडणुकीतील सर्वाधिक हाय होल्टेज ठरलेल्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपने आपला दबदबा कायम राखत दोन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवला. भाजपचे सोमनाथ कुऱ्हाडे आणि पुजा संजय घुंडरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुभवी उमेदवारांचा पराभव करत विजय खेचून आणला.
पहिल्या जागेसाठी झालेल्या लढतीत भाजपचे उमेदवार सोमनाथ कुऱ्हाडे यांना ७६२ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेंद्र कुऱ्हाडे यांना ७११ मते मिळाली. या चुरशीच्या लढतीत सोमनाथ कुऱ्हाडे यांनी ५१ मतांनी विजय संपादन केला. दोन्ही उमेदवारांमधील मतांचे अंतर अत्यल्प असल्याने ही लढत शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरली.
दुसऱ्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या पुजा संजय घुंडरे यांनी स्पष्ट आघाडी घेत राष्ट्रवादीच्या आशा आशिष गोगावले यांचा पराभव केला. पुजा घुंडरे यांना ८२७ मते, तर आशा गोगावले यांना ६५२ मते मिळाली. या लढतीत पुजा घुंडरे यांनी १७५ मतांनी दणदणीत विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली.
या प्रभागात अनुभवी आणि राजकारणातील मातबर उमेदवार रिंगणात असतानाही तुलनेने नवख्या चेहऱ्यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला, हे या निकालाचे विशेष ठरले. स्थानिक विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि प्रामाणिक कारभार या मुद्द्यांवर भाजप उमेदवारांनी प्रभावी प्रचार केला.
या निकालामुळे प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपची पकड अधिक मजबूत झाली. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.



