उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
मीच तुमच्या विकासाची कामे करणारा/करणारी आहे,मीच विविध योजना अंतर्गत वार्डातील नागरिकांची उन्नती करणारा/करणारी आहे,मी आपलाच/आपलीच आहे,आमचा पक्ष गोरगरिबांचा आहे,आमचे नेते खरे विकास पुरुष आहेत,मलाही आपली सेवा करण्याची संधी द्यावी,या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातंर्गत नगरपरिषद – नगरपंचायत नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पात्र ठरणारे उमेदवारांचे पाय आता मतदारांकडे वळणार आहेत…
आता पर्यंत नामनिर्देशन पत्र अपात्र होणार की पात्र ठरणार याबाबत सर्व उमेदवारात धाकधुक होती.ज्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र पात्र ठरले ते सर्व पात्र उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत असे समजण्यास हरकत नाही.
निवडणूकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांपैकी कोणी पक्षाचे गोडवे गाणार तर कुणी स्वतःचे गोडवे गाणार हे नक्की आहे.
मात्र,सर्व प्रकारच्या निवडणुकीत दारु,चिवळा व रुपयांचा उपयोग होत असल्याने मतदारांच्या नजरा रुपयांकडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पण,काही मतदार हे स्वाभिमानी असल्याने निवडणूकी दरम्यान कुणाच्याही रुपयांना,चिवळ्याला,व दारुला बळी पडत नाही.
जे मतदार निवडणूक दरम्यान दारु व चंद रुपयांना,बळी ठरतात त्यांना मताचा अधिकार कशासाठी आहे हे अजूनही कळले नाही असे समजावे लागेल.
मताधिकार हा सर्वश्रेष्ठ अधिकार आहे.या अधिकारामुळे स्वतःच्या अधिकाराचे व सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करता येते.
पण,मताचा अधिकार कशासाठी आहे आणि कशाप्रकारे मताचा अधिकार उपयोगात आणले पाहिजे याची जाणीव जोपर्यंत मतदारांना होत नाही,तोपर्यंत बहुसंख्येने बेईमान लोकप्रतिनिधी निवडून येणार हे सुद्धा तितकेच खरे आहे.
कधीकाळी नाईलाजाने इमानदार उमेदवारांना सुध्दा रुपयांचा उपयोग निवडणूकीत करावा लागतो असे दिसून येते आहे.
जे उमेदवार रुपयांच्या उलाढाली नुसार निवडणूक जिंकतात ते नगरसेवक विकासापेक्षा व लोकहितांच्या कामांपेक्षा निवडणूकीत खर्च केलेले स्वतःचे रुपये काढण्यासाठी तत्पर असतात,हे वास्तव मतदारांना माहिती असतांनाही चुकीच्या उमेदवारांना निवडून देण्याची चूक मतदार करतात असे म्हणणे चुकीचे ठरु नये.
मात्र,हि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक म्हणजे नगरपरिषद व नगरपंचायतीच्या होत असलेल्या सार्वत्रिक निवडणूका मतदारांच्या अस्तित्वासाठी आहेत व त्यांचे अधिकार वाचवण्यासाठी आहेत हे इमानदार उमेदवारांनी मतदारांना पटवून दिले पाहिजे.
मतदारांना लाचार करुन निवडणूका जिंकणारे हे कधीच लायक राहात नाही असे मतदारांच्या लक्षात का म्हणून येत नाही?हा खरा प्रश्न आहे.



