Home Political आळंदी नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग क्र.२ब मध्ये दोन माजी उपनगराध्यक्षांमध्ये प्रतिष्ठेची...

आळंदी नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग क्र.२ब मध्ये दोन माजी उपनगराध्यक्षांमध्ये प्रतिष्ठेची थेट लढाई… — माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर विरुद्ध नेटके कुटुंबातील तीन महिला…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक 

आळंदी – नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ यंदा सर्वाधिक चर्चेत राहणार हे स्पष्ट झाले आहे. माजी नगराध्यक्षा आणि दोन माजी उपनगराध्यक्ष थेट रणांगणात उतरल्याने प्रभागातील निवडणूक तापली आहे. स्थानिक पातळीवरील जुनी-नवी समीकरणे, कुटुंबीयांची चुरस आणि तीव्र प्रचारबाजी यामुळे या प्रभागातील लढत अधिकच रोमहर्षक ठरत आहे.

प्रभाग २अ : भाजपच्या वैजयंता उमरगेकर विरुद्ध नेटके कुटुंबातील तिहेरी आव्हान

      प्रभाग २अ मध्ये भाजपकडून माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर या पुन्हा उमेदवारीच्या रिंगणात असून, त्यांच्या विरोधात नेटके कुटुंबातील तीन महिला उमेदवार उतरल्या आहेत.

अनुपमा नेटके (शिवसेना – शिंदे गट)

सोनू नेटके (शिवसेना – ठाकरे गट)

योगिता नेटके (अपक्ष)

          एकाच कुटुंबातील तिन्ही उमेदवारांनी निवडणूक लढवल्याने या प्रभागात स्वतंत्रच राजकीय वर्तुळ तयार झाले आहे. उमरगेकर यांचा अनुभव आणि आधीच्या कारकिर्दीतील कामे लक्षात घेता त्यांचे पारडे जड मानले जात आहे. विरोधकांमधील मतांची दुभागणी उमरगेकर यांच्या पथ्यावर पडू शकतात.

प्रभाग २ब : दोन माजी उपनगराध्यक्षांमध्ये प्रतिष्ठेची थेट टक्कर

       प्रभाग २ब मध्ये भोसले विरुद्ध भोसले अशी थेट लढत आहे.भाजपचे रामचंद्र भोसले यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून सागर भोसले निवडणूक लढवत आहे. हे दोन्ही भोसले भाजप कडून उमेदवारी साठी इच्छुक होते माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र भोसले यांना भाजपने उमेदवारी दिल्याने माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवित आहे. दोघांचेही प्रभागातील कार्यकर्त्यांवर मजबूत वर्चस्व असल्याने ही लढत प्रभागातील सर्वाधिक तापलेली लढत समजली जात आहे. स्थानिक प्रश्न, वैयक्तिक जनसंपर्क आणि पक्षीय बळ यांचा परिणाम या प्रभागाच्या निकालावर होणार हे निश्चित.

राजकीय वातावरण तापले..

      प्रभाग २ मधील परिस्थिती पाहता आगामी निवडणुकीत अनुभवी नेतृत्व, कुटुंबीयांची थेट चुरस, पक्षीय सामर्थ्य आणि स्थानिक वर्चस्व यांचा‌ प्रभागनिहाय संघर्ष खुला झाला आहे. आळंदीत प्रचार मोहीम वेग घेत असून मते कोणाकडे झुकतात याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.