दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आगामी आळंदी नगरपरिषद निवडणुकीची सरगर्मी दिवसेंदिवस वाढत असून, गावठाण प्रभाग क्रमांक ६ मध्ये नवा आणि उत्साही चेहरा म्हणून सागर उर्फ हेमंत कुऱ्हाडे यांचे नाव चर्चेत आले आहे. सामाजिक बांधिलकी, तरुण नेतृत्व आणि नागरिकांशी सलोख्याचे संबंध या गुणांच्या आधारे सागर कुऱ्हाडे यांनी आपली मजबूत छाप निर्माण केली आहे.
सागर कुऱ्हाडे हे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांचे पुतणे असून, कुऱ्हाडे कुटुंबाला आळंदीच्या राजकारणात दीर्घ परंपरा लाभली आहे. बबनराव कुऱ्हाडे यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा ठसा आजही शहरवासीयांच्या मनात आहे. त्याच कार्यपद्धतीचा आदर्श ठेवत सागर कुऱ्हाडे हेही समाजकार्यात पुढाकार घेत आहेत.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये नागरिकांशी सातत्याने संवाद साधत, स्थानिक प्रश्न जाणून घेऊन त्यावर उपाययोजना सुचविण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. तरुणाईचा उत्साह, नागरिकांमध्ये आत्मीयता आणि विकासाची दृष्टी या तीन गुणांमुळे त्यांना स्थानिक स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सागर कुऱ्हाडे यांनी “आळंदीचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांसाठी पारदर्शक प्रशासन हेच आमचे ध्येय” असे स्पष्टपणे सांगितले आहे. प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यावर ठोस उपाययोजना राबवण्याचा त्यांचा मानस आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रभाग ६ मध्ये तरुण नेतृत्वाचा चेहरा म्हणून सागर कुऱ्हाडे यांचे नाव पुढे येत असून, त्यांच्या उमेदवारीने या प्रभागातील निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.



