एक म्हण आहे ती अशी “बोलाचाच भात बोलाचीच कडी खाऊन या तृप्त कोण झाला ? “याचा अर्थ केवळ बोलण्याने पोट भरत नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष भोजनच करावे लागते.
” तृप्ती ” याचा अर्थ सुख आनंद समाधान शांती. या जगात सुखी कोणीच नाही, कारण जिथे सुख आहे तिथे दुःख असणारच, म्हणून रामदास स्वामी म्हणतात की, जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तुझी शोधून पाहे. ज्याप्रमाणे शंभर टक्के सुखी कोणीच नाही त्याप्रमाणेच शंभर टक्के कोणीच समाधानी नाही आनंदी नाही म्हणजेच ज्याच्या जीवनात आनंद नाही सुख नाही समाधान नाही त्याच्या जीवनात शांती कशी असणार ?
माणूस का जगतो ? का मेहनत करतो, धडपड करतो, प्रयत्न करतो, त्यातून त्याला खरंच आनंद सुख समाधान शांती मिळते का, आणि जर मिळत नसेल तर मग एवढी धडपड कशासाठी ? हा प्रश्न विचारांती समोर उभा राहतो, याचे उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न कधी केला नाही, असा प्रयत्न करावा की करू नये असा पण प्रश्न समोर उभा राहतो.
काहीही असले तरी शेवटी इथे माणूस जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत तो तृप्तीसाठीच धडपडत असतो हे मात्र नक्की. असे असेल तर मग, तृप्ती येण्यासाठी काय केले पाहिजे? ती का मिळत नाही? ती कशी मिळेल? याबद्दल एकांतात विचार करायला काय हरकत आहे ? तृप्तीचा विचार तर केलाच पाहिजे.
माणसाला भौतिक आणि मानसिक अशा दोन प्रकारच्या गरजा आहेत, माणूस भौतिक सुख मिळवण्यासाठी अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या प्राथमिक गरजा सोडवण्यासाठी ज्ञानाच्या सहाय्याने यश मिळविले, एवढेच नाही तर त्याने सुखसोईच्या आणि चैनीच्या गरजा पण पूर्ण केल्या. तरी तो थांबत नाही, याचे कारण म्हणजे त्याचा स्वार्थ आणि हाव. यावर उपाय गौतम बुद्धांनी सांगितला, संत महात्म्यांनी सांगितला, तो म्हणजे मन हे सैरावैरा धावते त्यास कंट्रोल करणे गरजेचे आहे, तसे केल्यानेच तृप्ती मिळते, अन्यथा तृप्ती म्हणजे एक मृगजळच ठरते. मनाचा स्वभाव हा चंचल असल्यामुळे मन स्थिर होत नाही, हे खरे आहे, तरीपण मनाला लगाम घ**** आणि त्याचा लगाम बुद्धीच्या हातात ठेवणे आणि विवेकाला मालक बनविणे हे महत्त्वाचे आहे, असे केल्याने नक्कीच माणूस तृप्त होऊ शकतो आणि तृप्तीचा आनंद सुख समाधान आणि त्यातून शांती प्राप्त करू शकतो, यास मानसिक स्थैर्य किंवा मानसिक शांती असे म्हणतात. म्हणून बहुतेक सुख आणि मानसिक सुख अशा दोन प्रकारचे सुख आहेत. परंतु माणसाने केवळ भौतिक सुखालाच महत्त्व दिले आणि मानसिक सुखाला महत्त्व दिले नाही म्हणून तो तृप्तीच्या जगात वावरत नाही तर जन्मल्यापासून मरेपर्यंत तो अतृप्तीच्याच जगात वावरतो. याचा अर्थ माणूस हा अभावग्रस्त परिस्थितीत जन्मतो वाढतो आणि मरतो.
आता आपण तृप्तीचे जग म्हणजे काय यावर थोडे चिंतन करूया, माणसाला भौतिक गरजा आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय माणसाला सुख शांती आनंद समाधान मिळत नाही, तरी परंतु माणसाच्या प्राथमिक गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या पूर्ण झाल्यानंतर त्याने मनाला समाधान मानण्याची प्रॅक्टिस सुरू केली पाहिजे, जसे एखादे नाटक यशस्वी करायचे असेल तर त्याची आधी एक महिना दोन महिने प्रॅक्टिस करावी लागते तरच ते नाटक यशस्वी होते, अगदी त्याचप्रमाणे प्राथमिक गरजा या आवश्यकच आहेत कारण त्या पूर्ण झाल्याशिवाय मनुष्य जीवनच जगू शकत नाही, म्हणून त्या पूर्ण होईपर्यंत धडपड मरमर करणे आवश्यकच आहे, परंतु प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यानंतर थांबले पाहिजे, पण माणसाला पुढील हवा असते, उदा. अन्नाची गरज भागली तर अजून चविष्ट आणि पाहिजे असते, कपड्याची गरज भागली तरी अजून भरजरी कपडे हवे असतात, साधे घर राहायला मिळाले तरी बंगल्याची हाव असते, बंगला मिळाला तरी त्यात एसी हवी असते. सायकल असेल तर मोटर सायकल हवी असते, ती असेल तर कार हवी असते, ती मिळाली तर हेलिकॉप्टर हवे असते, ते मिळाले तर विमान हवे असते, शेती असेल तर कारखाना हवा असतो, एक असेल तर चार हवे असतात, छोट्या भांडवलदाराला मोठा भांडवलदार व्हावा वाटतो आणि मोठ्या भांडवलदारास जागतिक भांडवलदार व्हावे वाटते, आणि जागतिक भांडवलदारास साऱ्या जगावर आपलेच साम्राज्य हवे, हुकूमशाही हवी, सारे जग आपल्या बोटावर नाचावे असे वाटते. याचा अर्थ माणसाच्या विचाराला कल्पनेला सुखाला मर्यादा नाही, म्हणून ही मर्यादा म्हणजे काय? तिचे महत्त्व काय? आपल्या प्राथमिक शिक्षेच्या आणि चैनीच्या गरजा जे आहेत त्यापैकी कोणत्या मिळाल्यानंतर कुठे थांबले पाहिजे याचा विचार जर झाला तर नक्कीच माणूस तृप्तीच्या जगात वावरू शकतो आणि शांतीचा आनंद घेऊ शकतो हे नक्की. माणसाला जसा हवा आहे तसे अनुकरण करण्याची एक खोड आहे, ती सुद्धा चुकीची आहे, अनुकरण जरूर करावे परंतु कोणाचे अनुकरण करावे की ज्यामुळे जीवनात आनंद सुख समाधान शांती मिळेल, याचा विचार केला पाहिजे, पण सर्वसाधारणपणे सारीच माणसे ही आपल्यापेक्षा सुखात लोळणाऱ्या माणसाचे अनुकरण करतात, परंतु तो वरवर पाहता कितीही सुखी दिसत असला तरी आतून किंवा मानसिक दृष्ट्या तो किती खचलेला आहे, याचा अभ्यास कोणीच करत नाही, किंवा तो खरच समाधानी आहे का? तो खरच तृप्त झालेला आहे का? याचा अभ्यास कोणीच करत नाही, आणि जेव्हा असा अभ्यास होईल तेव्हा नक्कीच सुखाच्या मागे धावणाऱ्या माणसाचे अनुकरण कोणीच करणार नाही, याचा अर्थ दुःखाच्या मागे धावणाऱ्या माणसाचे अनुकरण करतील असे नाही, तर कुठेतरी थांबण्याची गरज आहे, याची प्रचिती विचार करणाऱ्या माणसाला नक्कीच येईल, त्याची मला खात्री वाटते.
खरे तर माणसाची गरज तर किती ? पोटाला पोटभर अंगाला अंगभर राहायला सावली शिक्षण आणि आरोग्य एवढे मिळाले तर बस झाले, इथे जर थांबले तर नक्कीच त्याच्या तृप्तीच्या जगात प्रवेश होईल.
तृप्तीचे जग याचा अर्थ ‘ हाव ‘ नव्हे. हाव हे तर दुःखाचे मूळ कारण आहे,असे ज्ञानी सांगतात आणि सांगून गेले. तृप्तीच्या जगातील माणसे, त्यांचा विचार आणि त्यांचे कृत्य किंवा कार्य हे आगळे वेगळेच असते, ते म्हणजे भौतिक गरजा पूर्ण झाल्यानंतर मानसिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात अशी माणसे ज्या जगात राहतात त्याला तृप्तीचे जग असे म्हणतात. माणसाला जशी शारीरिक भूक आहे तशीच मानसिक पण भूक आहे, याचा विचार झाला पाहिजे, पण असे होताना दिसत नाही, केवळ शारीरिक भूक भागवणे यासाठी भौतिक सुखाची अभिलाषा करणे एवढेच ज्ञान लोकांना आहे, पण त्याहीपेक्षा मानसिक नावाचे एक जग आहे त्याची गरज भागवण्याची पण आवश्यकता आहे, हे पण समजले पाहिजे. बहुतेक गरज तर प्राण्यांना पण असते, खाणे पिणे बच्चे पैदा करणे संरक्षण करून घेणे, ही त्यांची नैसर्गिक गरज ते स्वतः भागून घेतातच त्याचप्रमाणे माणूस हा सुद्धा एक प्राणी असल्यामुळे प्राण्याचे आणि माणसाच्या गरजा सारख्याच आहेत ज्या सारख्या आहेत त्या माणूस भागवितच असतो, परंतु शिक्षण आरोग्य आणि सुख सोयीच्या गरजा चैनीच्या गरजा या सुद्धा माणूस आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भागवीत असतो. माणसाला प्राण्यांपेक्षा बुद्धी नावाची गोष्ट अधिक आहे, त्याचा उपयोग तो फक्त भौतिक सुखासाठीच करतो, पण मानसिक सुखासाठी करत नाही, खरे तर भौतिक सुखाबरोबरच मानसिक सुख मिळणे पण आवश्यक आहे, कारण भौतिक सुख आणि मानसिक हे दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, म्हणून केवळ भौतिक सुख मिळाल्याने मानसिक सुख मिळणार नाही आणि मानसिक सुखी भौतिक सुखावर पण अवलंबून आहे, जसे की माणसाला अन्नपाणी निवारा मिळाला तरच तो मनाचा विचार करू शकतो, त्याची मानसिक स्वास्थ्य ठीक राहत अन्यथा बिघडते. आणि मानसिक स्वास्थ्य ठीक नसेल तर त्याचे शारीरिक स्वास्थ्य पण बिघडते, तात्पर्य शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टी एकमेकांशी पूरक आहेत म्हणून त्या दोन्ही गोष्टीचा विचार केल्याशिवाय माणसाच्या जीवनाला परिपूर्णता येत नाही याचाच अर्थ त्यास तृप्ती मिळत नाही म्हणजेच तो खऱ्या अर्थाने तृप्त होऊ शकत नाही.
शारीरिक भूक भागवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात तसेच मानसिक भूक भागवण्यासाठी पण काही गोष्टी कराव्या लागतात की ज्या माणूस करत नाही उदाहरणार्थ माणसाने आपले छंद जोपासले पाहिजे म्हणजेच गायन वादन नृत्य चित्रकला हस्तकला इत्यादी माणसांमध्ये काही सुप्त गुण असतात ती सुप्त गुण जपले पाहिजेत, त्यांचा अविष्कार केला पाहिजे, याचबरोबर प्रत्येक माणसात काही क्षमता आणि कौशल्य असतात, त्यांचा शोध घेऊन त्या क्षमता आणि कौशल्य यांना संधी प्राप्त करून दिली पाहिजे तरच माणसाची व्यक्तिमत्व फुलते, उदाहरणार्थ माणसांमध्ये शौर्य धैर्य दया क्षमा प्रेम मैत्री अशी एक काही सद्गुण आहेत त्यास प्रत्येकाने संधी निर्माण करून दिली पाहिजे म्हणजेच असे गुणवृद्धींगत होतील अशा प्रकारची काही कार्य केली पाहिजेत, तात्पर्य माणसातील सुप्त गुणांना वाव देणे आणि त्या सुप्तगुणानुसार आणि क्षमता व कौशल्यानुसार त्यास काम करण्याची संधी मिळणे आणि त्यातूनच त्याचे आर्थिक प्रश्न सुटणे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली पाहिजे, तरच माणसाचे मानसिक स्वास्थ्य ठीक राहते, माणसाचे शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य ठीक राहणे म्हणजेच तृप्तीच्या जगात वावरणे होय. यासाठी जनतेची मागणी आणि शासनाची भूमिका ही अहम असते, ती निभावणे हे दोघांचेही कर्तव्य आहे. असे कर्तव्य निभावल्या जात नाही म्हणूनच तृप्तीचे जग निर्माण व्हायला अडचण येत आहे.
प्रत्येक माणसाला या जगात आपल्या मनाप्रमाणे अनेक क्षमतेप्रमाणे व तीप्रमाणे विचाराप्रमाणे शरीर ताकदीप्रमाणे कार्य करण्याचे स्वातंत्र्य मिळणे म्हणजेच तृप्तीच्या जगाची निर्मिती करणे होय.
चला तर मग तृप्तीच्या जगाकडे.
लेखक : दत्ता तुमवाड.
सत्यशोधक समाज नांदेड.
फोन : 94 20 91 22 09.


