उद्योगांचे नदीत शिरणारे विषारी पाणी थांबविले पाहिजे :- जलपुरुष डॉ.राजेंद सिंग… — इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली डॉ.राजेंद्र सिंग यांची भेट….

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

आळंदी : श्रीक्षेत्र आळंदी-देहूच्या कुशीतून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीला वारकऱ्यांच्या मनात अतिशय पवित्र स्थान आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत इंद्रायणीचे प्रदूषण चिंतेचा मुद्दा झाला आहे. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थाकडे वाटचाल होत असताना ‘स्वच्छ, निर्मळ इंद्रायणी’ संकल्पनाही प्रत्यक्षात येणे आवश्यक आहे असे जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंग यांनी सांगितले.

          वर्धा येथे चला जाणूया नदीला या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमाला आळंदी येथील इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी कार्यरत असलेले इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे आणि पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांनी जलतज्ञ राजेंद्र सिंग यांची भेट घेतली यावेळी डॉ.राजेंद्र सिंग यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी शासनाने लक्ष घालावे यासाठी पाठपुरावा नक्की केला जाईल असे आश्वासन दिले.

       उद्योगांमुळे नद्यांमध्ये विष टाकले जात आहे. उद्योगांचे नदीत शिरणारे विषारी पाणी थांबविले पाहिजे. तेव्हाच नद्या वाचतील. नद्या प्रदूषणमुक्त केल्या पाहिजे. नद्यांना देखील स्वातंत्र्य आवश्यक आहे, असे मत जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

             यावेळी इंद्रायणी नदी बाबत जलपुरुष राजेंद्र सिंग यांना माहिती देताना विठ्ठल शिंदे यांनी सांगितले की इंद्रायणी नदीला वारकरी सांप्रदायिक माहात्म्य अलौकिक होय. या नदीत स्नान करणे म्हणजे मानवी देहाला पवित्र करून घेणे होय, अशी भाविकांची भावना आहे. मात्र, आजमितीस इंद्रायणी नदी फक्त कागदावर पवित्र नदी राहिली आहे. या नदीच्या उगमापासून संगमापर्यंत प्रदूषणाचा विळखा पडला आहे. केवळ नदीच नव्हे, तर काठावर आणि त्या लगतचा परिसर दुर्गंधीने व्यापलेला आहे. त्यामुळे नदीला नदी म्हणायची की नाला हेच समजत नाही. प्रदूषण थांबविण्यासाठी अनेक पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी पाठपुरावा केला. परंतु, अपेक्षित सुधारणा होत नाही. याउलट प्रदूषण समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. त्यावर चिंतन करून प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे असे विठ्ठल शिंदे यांनी सांगितले.