२४ तारखेला भाजप कार्यकर्त्यांची इंदापूर मध्ये बैठक..!! — येणाऱ्या सर्व निवडणुकी बाबत भुमिका स्पष्ट होणार…!!

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

         लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या अनुषंगाने दि. २४ रोजी इंदापूर येथील दूधगंगा येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला ज्येष्ठ व तरुण सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

           सदर कार्यकर्त्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील – ठाकरे व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून मार्गदर्शन करणार आहेत.

            इंदापूर तालुक्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये मित्र पक्षाबद्दल प्रचंड रोष आहे. कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या लोकसभेला मित्र पक्षाचे काम करायचे नाही असा कार्यकर्त्यांचा पक्ष नेतृत्वाकडे रेटा आहे. २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर याच कार्यकर्त्यांना विरोधी पक्षांच्या लोकांकडून प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.

            त्यातच गेल्या आठवड्यात पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील – ठाकरे व नीरा भीमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी इंदापूर मध्ये पत्रकार परिषद घेत या लोकांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे असे वक्तव्य करत मित्र पक्षातील नेत्यांना प्रतिअवाहन दिले आहे. त्यानंतर २४ तारखेला भाजप कार्यकर्त्यांच्या बैठक होणार असून या बैठकीत लोकसभेच्या अनुषंगाने भूमिका स्पष्ट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.