Home देशविदेश खोटे जग,खोटी माणसे…

खोटे जग,खोटी माणसे…

   खोटे जग म्हणजे या जगातील व्यवस्था ( रचना structure ) खोटी,आणि अशा जगातील माणसे पण खोटीच.याचा अर्थ काय घ्यावा ? जगाची रचना व्यवस्था खोटी आहे म्हणून माणसे खोटी आहेत का ? की या जगातील माणसे खोटी आहेत म्हणून जग खोटे आहे,किंवा जगाची व्यवस्था खोटी आहे ? कार्ल मार्क्स म्हणतो ” रचनेत दोष असला की माणसात दोष निर्माण होतात,म्हणजे माणसे बिघडतात,कारण चुकीची व्यवस्था असेल तर त्यातील माणसांचा नाईलाज होतो,उदा.या जगाची आर्थिक सामाजिक व्यवस्था जर विषमतेची असेल तर माणसांचे विचार आणि वर्तन विषमतेचेच असते.जे समतेच्या विचाराचे आहेत,त्यांना पण विषमतेचे व्यवहार करायला मजबूर करतात,कारण खोटे बोलणे,चोरी करणे चुकीचे आहे ,हे माहीत असूनही नाईलाज होतो आणि त्यांना खोटे वर्तन करावेच लागतात.म्हणून खोट्या जगामुळे माणसे खोटी बनतात,वागतात.

      काही लोकांचे म्हणणे असे की,खोट्या माणसामुळे च जग खोटे बनते,खोटी व्यवस्था निर्माण होते,उदा.या जागतिक स्वार्थी लोभी अहंकारी धूर्त कावेबाज लबाड ऐतखाऊ प्रवृत्तीचे, बदमाश लोकांना आपले वर्चस्व इतरांवर असावे,धनाचा संग्रह करावा,सर्वात श्रेष्ठ आपणच रहावे,बाकी कनिष्ठ असावेत,सत्ता प्रतिष्ठा आपलीच असावी, यासाठी खोटे बोलणे ,पिळवणूक अन्याय अत्याचार दादागिरी करतात ,अशा दुर्जन लोकांनीच हे खोटे जग निर्माण केले आहे,आणि अशा खोट्या जगाचे बळी सामान्य जनता आणि सज्जन पण झाले आहेत.याचा अर्थ दुर्जन दुष्ट लोकांनी ही खोटी व्यवस्था निर्माण केली,आणि या व्यवस्थेचे चालक पण तेच आहेत,तरी पण हे सुद्धा या खोट्या जगाचे बळीच आहेत,हे त्यांना समजत नाही.उदा.गरीब मध्यम श्रीमंत हे तीन वर्ग. या प्रत्येक वर्गात लोभी आणि दुष्ट प्रवृत्तीचे दुर्जन लोक असतात,( अर्थात यांची संख्या मोजकी आहे ) असे लोक चोऱ्या मारामाऱ्या करून,खोटे बोलून,इतरांची फसवणूक करून , पिळवणूक शोषण करून,दारू जुगार , तस्करी आणि अवैध असे छोटे मोठे धंदे करून गरीब हे मध्यम वर्गात आणि मध्यम हे श्रीमंत वर्गात , आणि श्रीमंत हे भांडवलदार वर्गात जाण्याची धडपड करीत असतात,खालचा वर्गाचा आदर्श हा वरचा वर्ग असतो.खालचा आदर्श नसतो,म्हणून ही खोटी ( विषमतेची ) व्यवस्था निर्माण झाली आहे.असे खोटे उपद्रवी लोकच या व्यवस्थेत ऐशरामी जीवन जगतात.आणि खरे आणि सरळ वागणारे आणि व्यवहार करणारे सामान्य आणि संखेने बहुजण लोक बिचारे पावलो पावली अपमानित गुलामीचे जीवन जगत असतात.कसे बसे या अन्यायी खोट्या जगात टिकून राहण्यासाठी हे पण खोटे बोलतात,मोठ्या नसल्या तरी छोट्या का होईना चोऱ्या मारामाऱ्या करतात.नव्हे कराव्याच लागतात,कारण खोट्या जगात संघर्ष केल्या शिवाय जगतातच येत नाही.म्हणून समोरचा माणूस खोटा असेल तर त्यास खरे बोलून त्याचे सोबत राहणे शक्य नसते,म्हणून जगच खोटे असेल तर खरा माणूस खरे वागणे शक्यच नसते.वेळ प्रसंगी खोटे बोलावेच लागते.

       गांधीजींनी या खोट्या जगात पण खरे व्यवहार करता येतात,हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक प्रयोग केले,ते सारे प्रयोग ” सत्याचे प्रयोग ” हे त्यांनी त्यांचे आत्मचरित्र लिहून ठेवले आहे,प्रत्येकानी वाचावे असेच ते आहे,म्हणून मी वाचले,सत्य वागण्याचा प्रयत्न केला,त्याचा परिणाम असा झाला की,बरेच प्रकल्प हातचे गेले,जे मिळायचे ते पण मिळाले नाहीत,भ्रष्टाचारी अधिकारी आणि व्यवस्थेमुळे .म्हणून मी ठरविले की, खोट्या जगात खरे वर्तन टिकत नाही.म्हणून मी पण इतर प्रामाणिक माणसे जे करतात तेच करायला सुरुवात केली.म्हणजेच मी आणि माझे विचार खरे असूनही मला खोटे वागण्याची वेळ आली.खोट्या जगात टिकून राहायचे तर खरे वर्तन करून टिकू शकत नाही.गांधीजींना. च कसे जमले त्यावर संशोधन केले पाहिजे.

      सामाजिक विषमतेची व्यवस्था आहे,म्हणजे वर्णव्यवस्था ,जातीव्यवस्था ,स्पृश्य अस्पृश्यता आहे,वरच्या जातीचे खालच्या जातीला हीन दीन हलके समजणे आणि आपण वरिष्ठ समजणे,वरिष्ठ जातीचे वर्चस्व,अपमान,गुलामी मान्य करणे,खालच्या जातीचे मालक समजणे ही मानसिकता नव्हे खोटारडेपणा या व्यवस्थेत म्हणजे जगात आहे,म्हणून तसे जगणे आहे.

      याचा अर्थ आर्थिक वर्ग आणि सामाजिक प्रवर्ग आणि जाती ची विषमता ही खोट्या लोकांच्या मानसिकतेतून निर्माण झाली.खोटे म्हणजे असत्य,आणि खरे म्हणजे सत्य.आजची जगाची व्यवस्था ही खोटीच आहे,असेच म्हणावे लागेल.

      धार्मिक क्षेत्राचे पण तसेच आहे.देव ,धर्म,स्वर्ग , वैकुंठ,कर्मकांड, जप तप,पूजा अर्चा,तीर्थाटन , नवस सायास, दैव भाग्य,चमत्कार, दान धर्म भंडारे , देवाचा धर्म आणि धर्माची देवळे हा सारा खटाटोप कशासाठी ? हे केल्याने काय मिळते ? खरेच मिळते का ? की ही अंधश्रधा आहे ? खरच देव आहे का ? त्याला पुरावे नाहीत,नीतिमत्तेसाठी धर्माची गरज की देवासाठी ? धर्म आणि नीतिमत्ता एक नसून प्रत्येकाचे अस्तित्व आणि अर्थ वेगळा आहे,धर्म न पाळता पण नीतिमत्ता पाळता येते.देव धर्म कर्मकांड आत्मा स्वर्ग नरक पाप पुण्य हे तर्कावर बुद्धीवर अनुभवावर प्रयोगावर विज्ञान दृष्टी शोध संशोधन या कसोटीवर टिकत नाहीत,म्हणजेच या साऱ्या गोष्टी खोट्याच आहेत,हे सिद्ध होते,तसेच या खोट्या गोष्टीमुळेच शोषण ,सत्ता,प्रतिष्ठा,संपती संग्रह टिकून आहेत,खोट्या लोकांनीच शोषण केले आहे,करीत आहेत, तेच सत्तेत आहेत,समाजात प्रतिष्ठित आहेत.हे आपण कधी समजून घेणार आहोत ? आणि अशा धार्मिक सामाजिक आर्थिक विषमतावादी व्यवस्थेमुळे आणि माणसांमुळे हे खोटे जग निर्माण झाले आहे,आणि आपण सामान्य जनता आणि बहुजन या खोट्या व्यवस्थेचे बळी आहोत,गुलाम आहोत,ही व्यवस्था कधी आणि कशी बदलणार हा खरा प्रस्न आणि चिंतेची बाब आहे,यासाठी परिवर्तनवादी लोकांनी दर आठवड्याला एकत्र येऊन सत्संगाप्रमाणे चिंतन केले पाहिजे.तरच खोट्यांचे खोटे जग उद्ध्वस्त होईल.

      लेखक : दत्ता तुमवाड

       सत्यशोधक समाज नांदेड

    दिनांक : 21 जून 2025.फोन : 9420912209.