Home Maharashtra मुख्यमंत्री फडणवीस यांच आश्वासन, आळंदीमध्ये कत्तलखाना होणार नाही,आरक्षणही रद्द…

मुख्यमंत्री फडणवीस यांच आश्वासन, आळंदीमध्ये कत्तलखाना होणार नाही,आरक्षणही रद्द…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

पुणे :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थळ असलेल्या तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये कत्तलखाना उभारला जाणार असल्याच्या चर्चांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आळंदीमध्ये कत्तलखान्यासाठी आरक्षित असलेली जागा रद्द करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. तिथे कत्तलखाना होणार नाही. मी वारकरी संप्रदायाला याबाबत पूर्ण आश्वस्त करतो.”

       या घोषणेमुळे आळंदीतील भाविक, ग्रामस्थ आणि लाखो वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आळंदीमध्ये कत्तलखाना उभारण्याच्या चर्चेमुळे संतापाची लाट उसळली होती. वारकरी संप्रदायाने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत सरकारकडे आपली भावना स्पष्टपणे मांडली होती.

      मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा मान राखत, आळंदीच्या पावित्र्याला कुठलाही धक्का न पोहोचवण्याची ग्वाही दिली. “संतांची भूमी ही आमच्यासाठी देखील श्रद्धेची आहे. अशा पवित्र स्थळी कोणत्याही प्रकारचा धार्मिक वा सांस्कृतिक वेढा येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

      या निर्णयामुळे वारकरी संप्रदायाचा विजय झाला असून, सरकारने जनभावनेचा आदर करून योग्य निर्णय घेतल्याचे अनेक स्तरांतून स्वागत होत आहे. आळंदी हे केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे — आणि त्या पावित्र्याच्या रक्षणासाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे.