ग्रामसेवकांचा वाली कोण? — त्यांनी काय करायचे? — त्यांनी कुणाचे ऐकावे? — त्यांनी मनमानी कारभार करायचा काय?

प्रदीप रामटेके

 मुख्य संपादक

           अलीकडच्या काळात ग्रामसेवक म्हणजे बाहुल असल्याचे समजून त्यांच्या सोबत प्रभावी राजकारणी,अनेक पक्षाचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी वागत असल्याचे आढळून आले आहे.

          याचबरोबर सर्वांच्या समस्या व सर्वांचा विश्वास किंवा अनेकांचा दबाव लक्षात घेऊन ग्रामसेवकांना कर्तव्य पार पाडावे लागत असल्याचे सत्यही समोर आहे.

              तद्वतच कायद्याच्या चौकटीत काम करीत असताना सर्वांचे समाधान ग्रामसेवकांकडून होणे शक्य नाही किंवा प्रत्येकाला घेऊन चालणेही शक्य नाही.

         कारण सर्वांचे म्हणणे व त्यानुसार त्यांच्या वृत्त्या आणि कृत्त्या ह्या कायदेशीर चौकटीत बसणाऱ्या असतीलच असेही राहात नाही.

               परत्वे एका ग्रामसेवकाकांकडे अनेक ग्रामपंचायतींचा भार असल्याने त्यांच्यावर कामाचा पडत असलेला तान त्यांच्या कार्यक्षमतेच्या बाहेर असू शकतो.

           याचबरोबर गावहित म्हणून एखादे काम दबावाखाली केले किंवा थोडे नियमबाह्य काम राजकीय-सामाजिक पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली केले तरी कायदेशीर चौकटी नुसार मरणे तर ग्रामसेवकालाच आहे.

            ग्रामसेवकांकडून येनकेन प्रकारे काम करवून घेणारे राजकारणी व ग्रामपंचायत पदाधिकारी असतात.(नियमानुसार काम करणारे सोडून किंवा काही वगळता),अशा वेळी ग्रामसेवकांवर प्रचंड दबाव येतो,  त्यांचे अंधारमय भविष्य त्यांच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभे ठाकलेले असते,याकडे कुणाचेच बारीक लक्ष नसल्याचे दिसून येते आहे.

           एखादे अयोग्य काम ग्रामसेवकांनी दबावाखाली केले किंवा नाही केले तरी त्याचे विविध परिणाम ग्रामसेवकांनाच भोगावे लागत असल्याचे चित्र सुध्दा सर्वत्र आहे.

              अगदी सुलक्षा कारणावरून ग्रामसेवकांना निलंबित केले जात आहे, त्यांना नाहक बदनाम केले जाते आहे व त्यांचे आयुष्य बरबाद केले जाते आहे,त्यांच्या संसारावर विपरीत परिणाम पाडल्या जातो आहे,याला कुठल्या प्रकारची कार्यप्रणाली म्हणायची?.

***

दुसरी स्पष्टता..

           याचबरोबर गावातील नागरिकांच्या महत्वपुर्ण किंवा आवश्यक समस्यांकडे दुर्लक्ष करून काही ग्रामसेवक राजकीय लोकांच्या म्हणण्यानुसार कर्तव्य पार पाडत असल्याचे सुध्दा आढळून आले आहे.अशा ग्रामसेवकांना गावातील नागरिकांच्या समस्या पेक्षा राजकीय लोकांचा आशिर्वाद महत्वाचा वाटतो आहे या सत्याला सुध्दा नाकारता येत नाही.

           मात्र कामचुकारपणा व हेवेदावे करणाऱ्या ग्रामसेवकांना राजकारणी व अधिकारी बिनधास्त संरक्षण देत असल्याचेही उघड्या डोळ्यांनी ग्रामीण भागातील नागरिक बघत आहे व नाईलाजाने चूप सुध्दा राहत आहेत.अशा निर्लज्ज कार्यपध्दतीचे समर्थन का म्हणून करावे?यावर सर्वांनी विचार केला पाहिजे या मताची ग्रामीण जनता आहे.

           तद्वतच कामचुकारपणा करणाऱ्या व हेवेदावे करणाऱ्या ग्रामसेवकांना संरक्षण देणारी राजकीय लोकांची कार्यप्रणाली ग्रामसेवकांना काय शिकवते?याचे साधे भान त्यांना राहातं नाही.

              स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी,राजकीय लोक ग्रामसेवकांमध्ये मनभेदवृत्ती,मतभेदवृत्ती,द्वेषवृत्ती,अहंकार वृत्ती,प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रुजवीतात व त्यांच्यात एकमेकांप्रती असहकार्य करणारी वृत्ती बढावण्यास कारणीभूत ठरतात असेही वास्तव आहे.

***

तिसरी स्पष्टता..

             ग्रामसेवक हा ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा असल्याने त्यांना ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत व इतर कायदेशीर दृष्ट्या काम करु देण्याची मोकळीकता असणे आवश्यक आहे.

              ग्रामसेवकांवर,राजकीय व इतर लोकांचा वारंवार येत असलेला नाहक दबाव त्यांच्या योग्य मनोबलाचा व योग्य कर्तव्याचा चुराडा करणारा असल्याने त्यांनी नियमबाह्य कामे करायची काय? हे शासन-प्रशासनाने एकदाचे स्पष्ट केलेले बरे.

 ***

चौथी स्पष्टता..

              ज्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक कर्तव्यावर असतात,त्या गावातील नागरिकांच्या बारीकसारीक समस्या निकाली काढण्यासाठी त्यांनी विविध अंगांनी,विविध गुणांनी,विविध समजदारींनी आणि विविध कायदेशीर बाबी अंतर्गत,स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करायलाच हवी व त्या गावातील नागरिकांमध्ये योग्य ग्रामसेवक म्हणून ओळख निर्माण करायला हवी,असेच त्यांचें नैतिक कर्तव्य आहे.

            लोकहिताचे कामे करताना जिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लागेल तिथे त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेण्यासाठी त्यांनी स्वतःला नेहमी तयार ठेवले पाहिजे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुध्दा आपुलकीने आणि जिव्हाळ्यांनी ग्रामसेवकांना सहकार्य व मार्गदर्शन केले पाहिजे.यालाच जबाबदारीचे उत्तम दर्शन म्हणतात.

***

              एकंदरीत ग्रामसेवकांना ग्रामपंचायत अधिनियमातंर्गत व शासनाच्या विविध धोरणानुसार कार्य करताना अडचणी जावू नये यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह,राजकीय-सामाजिक लोकसेवकांकडून आणि शासन-प्रशासनाकडून वेळोवेळी उत्तम सहकार्य मिळाले पाहिजे या अपेक्षेत ग्रामसेवक असतात हे समजून घेतले पाहिजे.

           तद्वतच काम न करता रुपये काढण्यासाठी राजकीय व स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा दबाव ग्रामसेवकांवर येवू लागला असल्याने ग्रामसेवकांनी नेमके काय करावे?या संबंधात त्यांना संरक्षण देणारी सुचीबध्द गोपनीयता असणे तितकेच महत्त्वाचे नाही का?

               याचबरोबर ज्या ठिकाणी ग्रामसेवक कर्तृत्व पार पाडतात त्या गावातील नागरिकांच्या बाबतीत मनभेदवृत्ती,मतभेदवृत्ती,द्वेषवृत्ती,व असहकार्य वृत्ती न बाळगता उत्तम ग्रामसेवक म्हणून पुढे यायला काय हरकत?