भारतीय प्रजासत्ताकाचा महानायक…

       ज्या प्रमाणे स्वातंत्र्य दिनी महात्मा गांधी आणि स्वातंत्र सैनिकांचा,महाराष्ट्र दिनी १०८ हुतात्म्यांचा,बालदिनी बालकांसह जवाहरलाल नेहरूंचा गौरव होतो त्याच प्रमाणे प्रजासत्ताक दिनी गौरव व्हावयास हवा तो भारतीय प्रजासत्ताकाच्या महानायकाचा अर्थात विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा.. 

     प्रजासत्ताक दिन म्हणजे या दिवसापासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अथक कार्यपूर्तता सार्थकी लागली. 

        मूळात आपण स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन यामधील फरकच समजावून घेतला नाही. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात इंग्रजांची राजवट,स्वतंत्र मिळविण्यासाठीचे लढे ही माहिती सांगणे अप्रस्तुत ठरते.त्या ऐवजी या दिवशी संविधान निर्मितीची पार्श्वभूमी,संविधानामुळे देशाची झालेली प्रगती,संविधान निर्मात्याचे योगदान मांडणे अपेक्षित आहे.स्वातंत्र्यदिनी ज्या प्रमाणे देशाला स्वातंत्र मिळवून देणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा गौरव होतो , त्याच प्रमाणे प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीचा गौरव होणे उचित ठरते.

        २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटनेचा अंमल सुरू झाला आणि देश सर्व प्रजेची सत्ता असणारा प्रजासत्ताक बनला.प्रजासत्तकोत्तोर ७४ वर्षांत सर्वसमावेशी राज्यघटनेच्या बळावर देशाने जी अतुलनीय प्रगती केली आहे,ती कौतुकास्पद आहे. 

      ७४ वर्षांपूर्वी साधी टाचणी बनविण्यास पात्र नसणारा देश आज चांद्र मोहीम,मंगळ मोहीम द्वारे आकाशाला गवसणी घालत आहेत.१९५० चे ईवलेसे लोकशाहीचे रोपटे आज जगात सर्वात मोठे संसदीय लोकशाहीवादी महावृक्ष म्हणून आदरणीय ठरत आहे. 

        राज्यघटनेमुळे देशात शैक्षणिक,सामाजिक, राजकीय,आर्थिक, सामाजिक,सांस्कृतिक क्रांती घडवून आली आहे.१९५१ साली देशाची साक्षरता १८.३३% होती २०११ साली ७४.४०% तर आज जवळपास ८५% एवढी वाढली आहे. 

          “एक व्यक्ति-एक मूल्य” आणि राज्यघटनेतील मूलभूत अधिकारामुळे सर्व भारतीयांना विकासाची समान संधी उपलब्ध झाली आहे .राज्यघटनीय राजकीय अधिकारामुळे वंचित घटकांना ग्राम पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत सत्तेत सर्वांना सहभागी होता आले आहे.

        स्वतःला एक साधा चहा विकणारे सांगणारे नरेंद्र मोदी आज देशाचे प्रधानमंत्री झालेत.हे सर्व बदल घडले ते राज्यघटनेमुळे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टी मूळे..

      डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून राज्यघटनेत समतावादी,मानवतावादी,बंधूत्ववादी कलमे समाविष्ट करून देशाला सर्वसमावेशी आधुनिक आकार दिला.ही कलमे घटना समितीत मांडणे,त्यावर साधक-बाधक चर्चा घडवून आणणे,सदस्यांच्या शंकांचे समर्पक अभ्यासपूर्ण उत्तर देणे आणि सर्वसंमतीने कल्याणकारी कलमे मंजूर करुन घेणे,हे महनीय कार्य बाबासाहेबांनी कुशलतेने पार पाडले.त्यांच्या या अमूल्य योगदानामुळे डॉ.आंबेडकरांना भारतीय संविधानाचे निर्माते म्हटले जाते.

     त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचे खरे महानायक ठरतात ते भारतीय राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर..

     प्रजासत्ताक दिनी भारतीय राज्यघटनेचे स्मरण करून डॉ. बाबासाहेबांच्या कार्याची कृतज्ञता म्हणून खालील उपक्रम राबवावे…..

१) सर्व माध्यमांच्या शाळा,विद्यालये,महाविद्यालये,सरकारी-निमसरकारी कार्यालये येथे ध्वजारोहण प्रसंगी भारतीय राज्यघटनेची प्रत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा सन्मानित करावी. 

२) विविध सांस्कृतिक कार्यक्रमात,भाषणात राज्यघटनेच्या आणि बाबासाहेबांच्या योगदानाचे महत्त्व सांगावे. 

३)डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेसह संविधानाच्या प्रतेची प्रमुख मार्गावरून ‘ संविधान गौरव ‘ रॅली काढावी.

४) संविधान जनजागृती विषयक विविध स्पर्धांचे आयोजन करावे. 

५) संविधानाच्या सरनाम्याचे सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयात सामुहिक वाचन करावे. 

६) प्रिंट मीडिया,इलेक्ट्रॉनिक मीडिया,सोशल मीडियावर या विषयाची जास्तीत-जास्त प्रसिद्धी करावी.

७)आपल्या प्रत्येक घरोघरी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून सोबत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा,फोटो लावावा.

    प्रजासत्ताक दिनी प्रजासत्ताकाच्या खऱ्या महानायकाला सन्मान देवून संविधान रक्षणाची प्रतिज्ञा घेणे हाच खरा अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा सार्थक दिन ठरेल.

                  अग्रलेखक 

              उज्वलकुमार भारतीय