Home क्रीडा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच क्रीडा उपक्रमांची नितांत आवश्यकता :- प्राचार्य व्ही व्ही कोठारे…...

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच क्रीडा उपक्रमांची नितांत आवश्यकता :- प्राचार्य व्ही व्ही कोठारे… — कलाबाई कन्या विद्यालय साकोली येथे क्रीडा महोत्सवाला सुरुवात…

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक 

साकोली : तालुक्यातील एकमेव मुलींची शाळा असलेली कलाबाई कन्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय व आनंदाबाई प्राथमिक शाळा साकोली येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी क्रिडासत्र या वार्षिक खेळ महोत्सवाचे भव्य व शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले.

        या क्रीडा महोत्सवाला अध्यक्ष म्हणुन शाळा व्यवस्थापक अध्यक्ष नेवाराम कडुकार, उपाध्यक्षा प्राचार्या व्हि.व्हि.कोठारे, प्रमुख पाहुणे पत्रकार ऋग्वेद येवले, धनराज बोकडे,माया श्याम टेंभुर्णे,एम.डी.नगरकर,मिनाक्षी राऊत,रचना वैद्ये,एस.एम.ईंगळे,प्रा.जाधव,ए.व्ही.भोयर,चेतक हत्तीमारे,गहाणे मॅडम,चुटे मॅडम,नाकाडे मॅडम उपस्थित होते.

        कार्यक्रमाची सुरुवात क्रीडाज्योत प्रज्वलन व सावित्रीबाई फुले व शारदा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विविध क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला.

        या वार्षिक खेळ महोत्सवात इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे .यामध्ये कबड्डी, खो-खो, १०० मीटर व २०० मीटर धावणे, रिले रेस, लांब उडी, बॅलन्स गेम तसेच मनोरंजक व कौशल्यवर्धक स्पर्धांचा समावेश आहे.

        कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण व सकारात्मक स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते. आजच्या डिजिटल युगात मैदानी खेळांचे महत्त्व अधिक वाढले असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

         अध्यक्षा प्राचार्या व्हि.व्हि.कोठारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शालेय जीवनात शिक्षणासोबतच खेळांचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक सुदृढता, मानसिक संतुलन व नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी अशा क्रीडा उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम सातत्याने राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

         पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे, शिक्षकांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे व व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे क्रिडासत्र वार्षिक खेळ महोत्सवाला आनंद, उत्साह व शिस्तीच्या वातावरणात सुरुवात झाली.