Home Political महापालिकांच्या रणधुमाळीत भाजपचा ‘मेगा फोडाफोडी’चा डाव; २२ जणांचा जाहीर प्रवेश… —...

महापालिकांच्या रणधुमाळीत भाजपचा ‘मेगा फोडाफोडी’चा डाव; २२ जणांचा जाहीर प्रवेश… — संजोग वाघेरे, रवी लांडगे, सुरेंद्र पठारे, सचिन दोडके, विकास दांगट, जालिंदर शिंदे, राजू मिसाळ, सायली वांजळे, प्रशांत शितोळे यांचा जाहीर प्रवेश…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

मुंबई : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राजकीय आखाड्यात जोरदार खेळी करत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल २२ नेत्यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. दोन दिवसांपूर्वी प्रवेशाचा मुहूर्त ठरला होता; मात्र अमावस्येमुळे तो पुढे ढकलण्यात आला. अखेर आजचा मुहूर्त साधत भाजपने ‘मिशन महापालिका’ला वेग दिला आहे.

       या ‘मेगा प्रवेशा’मुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून दोन वेळा निवडणूक लढवलेल्या सचिन दोडके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या शिष्टाईमुळे हा प्रवेश शक्य झाल्याची चर्चा आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

       मुंबईत पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात पुणे शहरातील शरदचंद्र पवार गटाच्या एकमेव आमदारांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. तसेच अजित पवार गटाच्या नगरसेविका सायली वांजळे यांचाही भाजपमध्ये समावेश झाला. विविध पक्षांतील माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकांत भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांची नावे…

       सुरेंद्र पठारे (शरद पवार गट), सायली वांजळे (अजित पवार गट), बाळा धनकवडे (शरद पवार गट), नारायण गलांडे (अजित पवार गट), विकास दांगट (अजित पवार गट), रोहिणी चिमटे (शरद पवार गट), सचिन दोडके, संजोग वाघेरे (शिवसेना ठाकरे गट – शहर प्रमुख), अमित गावडे (माजी नगरसेवक, शिवसेना), जालिंदर शिंदे, राजू मिसाळ (माजी नगरसेवक, राष्ट्रवादी), प्रशांत शितोळे (माजी नगरसेवक, राष्ट्रवादी), रवी लांडगे (माजी नगरसेवक) आदी.

        या ‘मेगा प्रवेशा’मुळे पुणे व पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून, महापालिका निवडणुकांआधीच राजकीय समीकरणे बदलू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.