Home Maharashtra स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते…

स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते…

 पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

 दखल न्यूज भारत

देसाईगंज :- स्वस्थ नारी म्हणजेच सशक्त समाजाची पायाभरणी या उदात्त संकल्पनेवर आधारित ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ या उपक्रमाचे उद्घाटन आज आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय, देसाईगंज येथे उत्साहात पार पडले.

          यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तसेच स्थानिक जनप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गटाच्या सदस्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

        या अभियानाचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याचे संवर्धन, कुपोषणावर मात, स्त्रीरोग तपासणी, रक्तहिमोग्लोबिन तपासणी, लसीकरण, तसेच महिलांना आरोग्यविषयक जनजागृती करून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविणे हे आहे.

        उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार रामदास मसराम म्हणाले की, समाजातील प्रत्येक कुटुंबाचा केंद्रबिंदू म्हणजे आई, आरोग्यदृष्ट्या निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब स्वस्थ राहते. त्यामुळे महिलांचे आरोग्य मजबूत करणे हे सरकारचे प्रमुख प्राधान्य आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना योग्य वैद्यकीय सेवा मिळाल्यास त्यांच्या जीवनमानात निश्चितच सकारात्मक बदल घडेल. 

        या अभियानाअंतर्गत महिलांच्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येणार असून, अॅनिमिया व कुपोषणावर उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. तसेच प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरच्या काळातील वैद्यकीय सेवा, लहान मुलांचे लसीकरण व कुटुंब नियोजनाविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

        या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ.मिसार, वैद्यकीय अधिकारी डॉ.इकबाल मिर्झा, जेसा मोटवानी, धनपाल मिसार, सागर वाढई आदी उपस्थित होते.

         समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आरोग्य विभागाच्या या उपक्रमाला समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रिय सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.