दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनास उत्साहात सुरुवात झाली. या कार्यक्रमाला मराठी बिग बॉस विजेता सुरज चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभली. धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पार पडले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार दिपक पाटिल, आळंदी देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, सभापती श्रीधर कुऱ्हाडे, राजाभाऊ चोपदार तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. बिग बॉस विजेता सुरज चव्हाणच्या गाजलेल्या ‘झापूक झुपूक’ गाण्यावर संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी सुरज चव्हाण बरोबर ठेका धरत कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच उपस्थित प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
चार दिवस चालणाऱ्या या स्नेहसंमेलनात नृत्य, नाट्य, गायन, क्रीडा स्पर्धा तसेच विविध कला उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून स्नेहसंमेलनामुळे शैक्षणिक वातावरणात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



