घोडाझरी धारणातंर्गत शेतकऱ्यांचा २० तारखेला रास्ता रोको आंदोलन…

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधी 

       घोडाझरी धरणापासून गडबोरी वितरिका ही ३५ ते ४० किलोमीटर लांब अंतरावर आहे.गडबोरी वितरिका ईतर वितरिकेपेक्षा दुपटीने लांब आहे.

          तरीही पूर्वी गडबोरीला शेवटपर्यंत पाणी पोहोचून शेतीला मुबलक पाणी मिळायचे.आता मात्र ते कसेबसे पंधरा दिवसातून एक दोन वेळा अपुऱ्या अवस्थेत मिळते. 

            मौजा गडबोरी पासुन ते घोडाझरी धरणा पर्यंतच्या नहरा लगत मोठ्या प्रमाणात शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण झालेले आहेत. या अतिक्रमण धारकांचे घोडाझरी विभागातील कर्मचाऱ्यांशी चिरीमिरीचे अतूट संबंध असल्याचे नेहमीच ऐकायला मिळते.

           म्हणूनच ‘एग्रीमेंट धारक उपाशी अन अतिक्रमण धारक तूपाशी” अशी अवस्था झाली आहे. 

           गडबोरी वितरीकेच्या शेवट पर्यंतच्या शेतीला मुबलक पाणी न मिळण्यास गडबोरी वितरीकेच्या दोन्ही बाजुला वाढलेले अतिक्रमण कारणीभूत आहे.हिच खरी वास्तविकता आहे. 

          हजारो हेक्टर जमीन धान पिकाची असल्यामुळे शेतीला मुबलक पाणी मिळणे आवश्यक आहे.तलाव तुडुंब भरलेले असतानाही यावर्षीही फक्त दोन-चार दिवस पाणी मिळते तर शेवटपर्यंत लांबलेले पाणी अचानक बंद होते.

            त्यामुळे अंतिम टोकावरील शेतकरी द्विधा मनस्थितीत असून शेतकऱ्यात लोकप्रतिनिधी व प्रशासना विरुद्ध असंतोष निर्माण झालेला आहे.

           योग्यवेळेस शेतातील धान पिकाला पाणी न मिळाल्यास हजारो हेक्टर मधील धानपिक करपण्याची शक्यता नाकारता येत नाही.परिणामी शेतकऱ्यापुढे आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.

           म्हणून तत्पूर्वी अंतिम टोकावरील गावांना शेतीकरिता अखंडित पाणीपुरवठा न झाल्यास वानेरी, रामाळा, गडबोरी, मिनघरी, नाचनभट्टी, उमरवाही व अंतरगाव इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी घोडाझरी विभाग सिंदेवाही कार्यालयाला दिनांक २०/१०/२०२३ रोजी शुक्रवारला घेराव घालून दुपारी १:०० वाजता शिवाजी चौक सिंन्देवाही येथे “रास्ता रोको आंदोलन” करण्यात येणार आहे.

          आंदोलनात घोडाझरी धरणा अंतर्गत गडबोरी वितरीकेच्या टेल वरील संपूर्ण एग्रीमेंट धारक शेतकरी व कुटुंबासह सहभागी होतील.

          या विषयाची वर्तमान लोकप्रतिनिधी आमदार-खासदार तसेच प्रशासना कडून वेळीच दखल घेण्यात यावी.अन्यथा यांच्याविरुद्ध घोषणा देत रास्तारोको आंदोलन ” करण्यात येईल. 

           आंदोलनापूर्वी घोडाझरी धरणाचे बंद केलेले पाणी गडबोरी वितरीके च्या टेलवरील गावांना अखंडित पाणी पुरवठा करण्यात यावे. 

        आंदोलकांच्या गडबोरीच्या टेलवरील गावांना अखंडित पाणी पुरवठा सुरु ठेवणे, अतिक्रमण धारकाशी साटेलोट्याचे सबंध प्रस्तापित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणे,मुख्य वितरीकेच्या उपनलिकेला लावलेले अवैध सिमेंट पाईप काढणे, मुख्य वितरीका व उपनलिकेचे नादुरुस् गेट दुरुस्त करणे, नवरगाव ते वानेरी मुख्य वितरीकेतील गाळ उपसा करणे यासारख्या प्रमुख मागण्या आहेत.

          गडबोरी ते नवरगाव पर्यंतच्या मुख्य वितरीकेवर मुरूम टाकणे या सारख्या प्रमुख मागण्या असुन त्वरित निपटारा करण्याची मागणी मुरलीधर काशिनाथ मडावी केशव भाऊराव नागोसे रमपाल धाडूजी गरमडे, अजय प्रेमदास गुरु, गजाजन दादाजी कुन्नावार, मारोती नागोराव पात्रे योगेश बळीराम खडसिंगे या शेतकऱ्यांना केली आहे.