पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- आगामी नगर परिषद देसाईगंज सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार रामदासजी मसराम यांच्या नेतृत्वाखाली भव्य नामांकन रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते.
हटवार मंगल कार्यालयापासून नगर परिषद कार्यालयापर्यंत ही रॅली उत्साहात पार पडली. या रॅलीदरम्यान काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून वनिता अशोक नाकतोडे यांनी अर्ज दाखल केला.
तसेच नगरसेवक पदासाठी सर्व जागा उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल केले. रॅलीत काँग्रेस पक्षाचे अधिकृत चिन्ह हाताचा पंजा असलेले बॅनर, तिरंगी झेंडे, घोषणांनी परिसर दुमदुमले.
सकाळी १०.३० वाजता सुरू झालेल्या या रॅलीत आमदार मसराम यांच्या सोबत काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, महिला, युवक, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रॅलीद्वारे काँग्रेसने जनतेसमोर संघटनेची ताकद, एकजूट आणि विकासाची वचनबद्धता प्रदर्शित केली.
या प्रसंगी आमदार रामदास मसराम यांनी आगामी निवडणुकीत जनतेच्या विश्वासावर यश मिळवून देसाईगंजच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.



