Home Political अंतरगाव – नीमगाव, व्याहाड खुर्द – पाथरी दिग्गजांचे ‘स्वप्न हवेत’…

अंतरगाव – नीमगाव, व्याहाड खुर्द – पाथरी दिग्गजांचे ‘स्वप्न हवेत’…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

       सावली तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या आरक्षण सोडतीनंतर सावली तालुक्यातील राजकीय गणितांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या अपेक्षेच्या पूर्ण विरुद्ध निकाल लागल्याने तालुक्यातील राजकीय वातावरणात निराशेचे ढग दाटले आहेत. अनेक ठिकाणी ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र पाहावयास मिळाले.

       विशेषतः अंतरगाव व व्याहाड खुर्द या गटांमधील आरक्षणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. या दोन्ही गटांमध्ये जिल्हा परिषदेच्या पुरुष या श्रेणीत जागा येईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. या अपेक्षेच्या आधारे अनेक दिग्गजांनी गाठीभेटी, राजकीय हालचाली, नियोजन सुरू केले होते; मात्र आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्व समीकरणांवर पाणी फिरले आहे.

        अंतरगाव निमगाव गटामध्ये सर्वसाधारण महिला तर व्याहाड गटामध्ये ओबीसी महिला असे आरक्षण घोषित झाल्याने अनेक संभाव्य उमेदवारांचा पत्ता कट झाला .या दोन्ही गटामधून जिल्हा परीषदेसाठी दावेदारी सादर करण्यासाठी सज्ज असलेले अनेक दिग्गज आता नाराजी व्यक्त करत आहेत.

        राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही गटात पुरुष जागा येणार या अपेक्षाने काही दिग्गजांनी जवळपास तयारीही पूर्ण केली होती.

        प्रचाराची प्राथमिक पातळीवर सुरुवात, कार्यकत्यांशी संवाद, सामाजिक कार्यक्रमात उपस्थिती यासारख्या हालचालींना वेग आला होता; मात्र आरक्षण पुरुष झाल्याने या सर्व तयारीवर पाणी फिरले आहे. 

       अनेक पुरुष उमेदवारांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. तालुक्यातील इतर गटांमध्येही काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे आरक्षण मिळाल्याने आनंद साजरा करण्यात आला. मात्र अंतरगाव व्याहाड खुर्द या दोन्ही गटातील आरक्षणाने राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली असून अनेक दिग्गजांना आपली रणनीती नव्याने आखावी लागणार आहे.

       आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आरक्षण निकालामुळे तालुक्यात नवे चेहरे पुढे येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी महिला उमेदवारांसाठीही संधी निर्माण झाल्याने राजकीय शर्यतीचे समीकरण रंगतदार होणार आहे.

       तालुक्यात काही गटात व गणात निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. आता कोण कोण मैदानात उतरणार, कोणाची बाजी लागणार आणि कोणाला बाजूला व्हावे लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.