Home सांस्कृतिक माऊलींच्या नगरीत भक्तीच्या स्वरांनी उजळली दिवाळी पहाट… — वसुबारस निमित्त पं.आनंद...

माऊलींच्या नगरीत भक्तीच्या स्वरांनी उजळली दिवाळी पहाट… — वसुबारस निमित्त पं.आनंद भाटे यांची भक्तिमय मैफिल; रसिकांची भक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती..

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक 

आळंदी : दिवाळीच्या शुभारंभी वसुबारस निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात आज पहाटे भक्तीच्या सुरांनी वातावरण भारले. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आयोजित “दिवाळी पहाट संगीत महोत्सवात” सुप्रसिद्ध गायक पं.आनंद भाटे यांच्या भक्तिमय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

      सकाळी सहा वाजल्यापासूनच मंदिर परिसरात भक्तगायनाचे सूर दुमदुमले. “ज्ञानेश्वरी नामस्मरण”, “अभंगवाणी”, “हरिपाठ” आणि “संतांचे भजन” अशा भक्तिप्रधान रचनांमधून पं.भाटे यांनी वारकरी परंपरेचा आणि दिवाळीच्या मंगलतेचा सुंदर संगम साधला. “तेजोमय हे रूप तुझे माऊली”, “अवघा रंग एक झाला” यांसारख्या अभंगांवर श्रोते भावविभोर झाले. यावेळी हामोर्नियम वर सुयोग कुंडलकर, तबला प्रशांत पांडव, पखवाज प्रसाद जोशी, ताल शिरीष जोशी यांनी साथसंगत केली व निरुपण श्रेयश बडवे यांनी केले.

       कार्यक्रमास आळंदीतील अनेक मान्यवर, वारकरी भाविक, आळंदीकर तसेच असंख्य संगीतप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी माऊलींच्या मुर्तीना पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलन करून महोत्सवाची सुरुवात झाली. मंदिर परिसर फुलांनी, दिव्यांनी आणि सजावट दिव्यांनी उजळून निघाला होता.

        मंदिर समितीच्या वतीने पं.आनंद भाटे व सहकार्यांचा सन्मान प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, विश्वस्त डॉ.भावार्थ देखने व चैतन्य महाराज कबीरबूवा यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा यांनी सांगितले, की “दिवाळीच्या निमित्ताने भक्तीमय संगीताने पहाट उजळवणे ही आळंदीची परंपरा आहे. यामुळे माऊलींच्या चरणी भक्तीचा दीप अधिक तेजोमय होतो.”या पहाट संगीत महोत्सवामुळे आळंदी नगरीत भक्ती आणि आनंदाचा उत्सव साजरा झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.