समतेची लढाई म्हणजे मानवी हक्काची ,मानवी अधिकाराची,मानवी अस्तित्वाची लढाई होय.ती ज्यांनी हे हक्क हिरावून घेतले आणि बहुजनास वंचित केले,त्यांच्या विरोधात ही लढाई आहे.म्हणजेच आहेरे आणि नाहीरे यांच्यातील ही लढाई आहे.
वंचित याचा अर्थ ज्यांना रोजगार नाही,शिक्षण नाही,आरोग्य सुविधा नाहीत.नागरी सुविधा ( पाणी लाइट रस्ते स्वच्छता ) नाही,उत्पादनांची साधने ( शेती,कारखाने,उद्योग,व्यवसाय,व्यापार ) नाहीत.असले तरी ते कायम घाट्यात चालतात,त्यामुळे नेहमीच दिवाळे निघते,आणि ज्यांच्याकडे उत्पादनाची कोणतीच साधने नाहीत,म्हणून आपले जीवन केवळ श्रम किंवा बुद्धी विक्री करूनच चालवावे लागते,असा समाज म्हणजे वंचित समाज.
ज्या देशात मालक आणि नोकर ही व्यवस्था आहे,म्हणजेच गुलामीची व्यवस्था आहे,त्या देशात विषमता नांदते.आणि ज्या देशात मालक नोकर,ही व्यवस्था नाही,ज्या देशातील जनता स्वतःसाठी आपले शारीरिक श्रम आणि बौद्धिक श्रम विकत नाही,तर केवळ देशासाठी श्रम करते,स्वतःसाठी श्रम न करता केवळ देशासाठी श्रम करते ( ज्यात स्वतःचे हित पण समाविष्ट असते ) अशा देशातील जनता गुलाम नसते,अशा देशात कुणीच कुणाचा मालक किंवा नोकर नसतो.याचा अर्थ असा देश गुलामी मुक्त असतो.अशा देशात सुविधांचा अभाव असला तरी सर्वासाठी सारखाच असतो,प्रगती ही पण सर्वांची सारखीच होत असते.कारण जिथे समतेची व्यवस्था आहे,तिथे सर्वांना समान संधी असते,समान दर्जा असते.तिथे आर्थिक विषमता नसते,गरीब मध्यम श्रीमंत असे वर्ग नसतात.अशा देशात जाती व्यवस्था तग धरू शकत नाही,तिला खतपाणी मिळत नाही,म्हणून ती जिवंत राहणार नाही.धर्मातील दांभिकपण असणार नाही.कारण समतेच्या देशात संपत्तीची मालकीचं असणार नाही.खाजगी मालमत्तेचा अधिकार हक्क जिथे असतो,तिथे शोषण,पिळवणूक,काळाबाजार,भ्रष्टाचार असणारच.कारण गरीब मध्यम श्रीमंत सारेच खाजगी मालमत्ता संपती मिळवण्याचा , आणि ज्यांच्याकडे आहे,त्यात अजून भर टाकण्याचा प्रयत्न करीत असतात.खालच्या वर्गाचा आदर्श हा वरचा वर्ग असतो.खालच्या जातीचा आदर्श हा वरची जात असते,म्हणून खालचे हे वरच्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.वरच्यात जाण्यासाठी प्रयत्न करतात,त्यासाठी वरच्यांशी तडजोड ,गुलामी करणे हे पसंद करतात.स्वाभिमान गहाण ठेवतात,स्वार्थापायी.खालच्यांचे शोषण करतात.नव्हे तर सर्वच वर्ग आणि सर्वच जाती ह्या एकमेकांचे शोषण करीत असतात.शोषणात सत्य न्याय नीती याला किंमत नसते.स्वार्थापुढे या गोष्टी तुच्छ वाटतात.काल्पनिक अव्यवहार्य वाटतात.म्हणून विषमतेच्या देशात स्वातंत्र्य बंधुभाव सर्वधर्म समभाव,न्याय या गोष्टी कुचकामी ठरतात.यांचे स्थान कचराकुंडीत असते.विषमतेचा मूळ पायाच स्वार्थ लोभ द्वेष कपट हिंसा हे सारे विकृत विचार भावना आहे.समतेच्या व्यवस्थेचा पायाच मुळी विकृतीच्या विरोधी आहे.सत्य न्याय निष्ठा प्रेम दया क्षमा शांती नीती या सद्गुणावर आधारलेला आहे.इथे स्वार्थ लोभ द्वेष मत्सर बदला घेणे,हिंसा यास मुळीच थारा नाही.यांना थोडेसे पण डोके वर काढण्याची संधी नाही.कारण समतेच्या भूमीत विषमतेची बीजे रुजत नाहीत.मात्र विषमतेच्या भूमीत समतेची बीजे रुजू शकतात.कारण विषमतेच्या तुलनेत समतेची बीजे ही अधिक सशक्त आणि दर्जेदार असतात.समतेपुढे विषमतेची भूमी असो की बीजे असोत ती टिकाव धरू शकत नाहीत.परंतु समतेची बीजे ( विचार ) साऱ्यांच्या डोक्यात पेरणे महत्त्वाचे आहे,पण हे पेरण्याचे काम अत्यंत मंद गतीने होताना दिसते.जे समतावादी विचारांचे लोक आहेत,ते पण विषमतेच्या वातावरणात राहत असल्यामुळे त्यांना तयांना समतेची बीजे पेरणे कठीण जात आहे.आणि ज्यांना शक्य आहे,त्यांनी तन मन धन या पेरणीसाठी अर्पण करण्यास तयार नाहीत.जे आहेत ते फक्त बोटावर मोजण्या एव्हढेच आहेत.याचा अर्थ समतेची पेरणी करणाऱ्यांची संख्या जेव्हढी अधिक होईल तेव्हढी ही विषमते विरुद्ध ची लढाई जिंकता येईल.
मानवी हक्काची लढाई म्हणजे अस्तित्वाची लढाई.ही तेंव्हाच यशस्वी होईल,की ,जोपर्यंत वंचित समाज एकी करून समतेची लढाई लढणार नाही.
वंचितांचा लढा हा समतेसाठी असला पाहिजे.आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक विषमते विरूद्ध,अन्यायाविरुद्धं लढले पाहिजे. वरच्या जातीचा वरच्या वर्गाचा दर्जा मिळावा म्हणून नव्हे तर सर्व जाती धर्म वर्ग समानतेच्या पातळीवर एक होण्यासाठीची लढाई म्हणजेच समतेची लढाई विषमते विरुद्ध होय.
इथे कुणी लहान मोठा,खालचा वरचा,गरीब श्रीमंत नाही ,तर सर्व सारखेच आहेत.सारी मानवजात एकच आहे.भेदभाव नाही.सारे निसर्गाचीच अपत्य आहोत.म्हणून निसर्ग साधन संपती ( जल जंगल जमीन हवा ) यावर सर्वांचा सारखाच हक्क आणि अधिकार आहे. आम्ही कुणी कुणाचे मालक अथवा नोकर नाही.सारे भाऊ भाऊ आहोत.हा बंधुभाव म्हणजेच मानवता धर्म ” आम्ही पाळू.साऱ्यांचा हाच एक धर्म आहे.या पेक्षा निराळा धर्म आणि धर्मभेद नाही.अशा प्रकारचे विचार,म्हणजे समतेचे विचार.विश्वबंधुत्व,विश्वाची हे माझे घर,ही उदात्त व्यापक भावना म्हणजेच समता होय.यासाठी ही लढाई आहे.जी प्रत्येकांनी लढलीच पाहिजे.कारण यातच सर्वांचेच ( सर्व जाती ,सर्व वर्ग,सर्व धर्म ) हित निहित आहे.हे डोक्यात घुसायला थोडा फार वेळ लागेल,पण याशिवाय हिंसा थांबणार नाही,सुख,शांती,समाधान,चैन मिळणार नाही.ही काळया दगडावरची रेषा समजावी.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक : 17 ऑक्टोबर 2025.फोन: 9420912209.



