गुलामगिरीची मानसिकता घालविण्याचे श्रेय संविधानाला : प्रा.अविनाश कोल्हे  — ‘भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी : एक आकलन’ व्याख्यानाला चांगला प्रतिसाद

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

पुणे: ‘इ.स. १७७३ च्या रेग्युलेशन अॅक्ट पासून लंडनच्या पार्लमेंट मधे होणाऱ्या विविध कायद्यांमध्ये आजच्या संविधानाचे मूळ दडलेले आहे, भारतीय लोकांमध्ये असणाऱ्या गुलामगिरीच्या मानसिकते मुळे, दसपटीने मोठ्या असणाऱ्या भारतावर इंग्लंड ने राज्य केले, हे राज्य करत असताना, वेळोवेळी येणाऱ्या अडचणी, समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी करण्यात येणाऱ्या कायद्यांचे रुपांतर हळूहळू मोठ्या संविधानामध्ये झालेले आपल्याला दिसते. या सर्व प्रवासात गुलामगिरीची मानसिकता घालविण्याचे श्रेय संविधानाला आहे’, असे मत प्रा.अविनाश कोल्हे यांनी व्यक्त केले.

‘भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी : एक आकलन’ या विषयावर कोल्हे बोलत होते, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख उपस्थित होते. गांधीभवन येथे शनिवारी सायंकाळी हे व्याख्यान झाले.

       कोल्हे पुढे म्हणाले की ‘पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीयांना आपले शौर्य दाखविण्याची संधी मिळाली, संपूर्ण जगाने भारतीयांमधील शौर्य पाहिले, आणि भारत स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सक्षम आहे, हे प्रकर्षाने जाणवू लागले, तोपर्यंत भारतीय लोक बायकांना जाळतात, सती पाठवतात, बायकांना शिक्षण देत नाही, विधवा विवाहाला मान्यता नाही, यामुळे, भारतीयांविषयी ब्रिटिशांच्या मनात बेशिस्त, अडाणी, अंधश्रद्ध लोक असल्याची भावना होती. हे लोक स्वातंत्र होण्याच्या योग्यतेचे नाही, असे इंग्रजांना वाटले. भारतावर राज्य करायचे तर त्यांच्या शिक्षणाचा स्तर वाढवावा यादृष्टीने शिक्षण देणे सुरू झाले, तसे कायदे आले’. 

        ‘सती प्रथा बंद झाली, विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. महायुद्धातील भारतीयांच्या कामगिरी नंतर निदान स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र, हे स्वातंत्र्य हळूहळू टप्याटप्याने देऊ असे सांगण्यात आले’, अशीही पार्श्वभूमी कोल्हे यांनी सांगितली.

       हिंदू महासभा व मुस्लिम लीग यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात झालेल्या निवडणुकीत युती करून धर्मनिरपेक्ष काँग्रेस विरोधात निवडणूक लढवली होती आणि बंगाल, नॉर्थ फ्रंटीयर, पंजाब व सिंध प्रांतात (आज सर्व भाग पाकिस्तानात आहे) निवडून आल्या युतीचे नेते सावरकर, आणि जीना होते, त्यामुळे फाळणीत हे वरील तीन प्रांतच प्रामुख्याने आहेत हे आपल्या लक्षात येईल’ , असेही मत कोल्हे यांनी व्यक्त केले.

       डॉ लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले “इंग्रजांनी वेळोवेळी विविध कायदे करून राज्यघटना बनविण्यात मदत केली असली तरी, भारतीयांचे त्यात मोलाचं योगदान आहे, त्यात मुख्यतः अनी बेझंट, महात्मा गांधींचे संविधान, शाहू महाराजांनी मोफत शिक्षण, विधवा विवाह कायदा, अशा अनेक सुधारणांमुळे संविधानाला भारतीय लोकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम झाला. 

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संदीप बर्वे यांनी केले.यावेळी डॉ.कुमार सप्तर्षी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.