दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – ‘ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर’ या भावनेने राज्यभरातून आलेल्या लाखो वारकऱ्यांनी आळंदी नगरीला भक्तिरसात न्हाऊन टाकले. शुक्रवार (१४ नोव्हेंबर) रात्रीपासूनच भाविकांची वाढती गर्दी, ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात दुमदुमणारे देऊळवाडा आणि टाळ-मृदंगाच्या अखंड नादाने संपूर्ण अलंकापुरी भक्तिमय वातावरणात नटून गेली.
मध्यरात्रीपासून स्वकाम सेवा मंडळाच्या सेवकांनी देऊळवाडा परिसर स्वच्छ करण्यात गुंतून वातावरण अधिक पवित्र केले. घंटानादानंतर रात्री साडेबारा वाजल्यापासून पहाटे दीडपर्यंत ११ ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात संजीवन समाधीवर पवमान अभिषेकाची विधी संपन्न झाली. मुख्य गाभारा व देऊळवाडा फुलांच्या आकर्षक सजावटीने समाधी वर सुशोभित करण्यात आला होता. माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवत पंचामृत व सुगंधी सामग्रीने अभिषेक करण्यात आला. केशरी मेखला, शाल, तुळशीहार व सोनेरी मुकुटाने समाधी अधिक देखणी दिसत होती. आरतीनंतर देवस्थानतर्फे मान्यवरांना नारळ प्रसाद देण्यात आला.
बेरे दांपत्याला ‘मानाचा वारकरी’ मान..
यंदा ठाणे जिल्हा शहापूर तालुक्यातील सावरोली बु. येथील वारकरी शंकर बेरे व निर्मला बेरे यांना ‘मानाचा वारकरी’ म्हणून सन्मानित करण्यात आले. देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यास खासदार संजय जाधव, आमदार बाबाजी काळे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज लोंढे, डॉ.भावार्थ देखणे, ॲड.रोहिणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, स्वप्नील कुऱ्हाडे, सुरज आरु, मुख्याधिकारी माधव खांडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमाजी नरके, विजय जगताप, डी.डी. भोसले-पाटील, अजित वडगांवकर आदी मान्यवरांसह आळंदीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारीची प्रचंड गर्दी : दर्शनरांगा तुडुंब भरल्या
कार्तिकी एकादशी (१५ नोव्हेंबर) निमित्त पहाटेपासूनच लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी शहरात दाखल झाले. वैतागेश्वर मंदिरालगतचा दर्शन मंडप सकाळीच खचाखच भरला होता. दर्शनरांगा दत्त आश्रमापर्यंत पोहोचल्या होत्या.
इंद्रायणी घाटावर स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. पताका खांद्यावर, डोईवर तुळशी वृंदावन, टाळ-मृदंगाचा नाद, हरिनामाच्या गजरात वारकरी दिंडी प्रदक्षिणेत तल्लीन दिसत होते. संत-महात्म्यांच्या पालख्या दिंड्यानगर प्रदक्षिणा पूर्ण करून समाधी मार्गे दर्शनार्थ दाखल होत होत्या.
दुपारी १ वाजता पालखीची नगरप्रदक्षिणा
कार्तिकी एकादशी उत्सवानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दुपारी १ वाजता पारंपरिक मिरवणुकीने नगरप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ होणार आहे. शहरभर वाहतूक व सुरक्षेची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात आणि हरिनामाच्या अखंड निनादात आळंदी नगरी सध्या भक्तिरसात रंगून गेली आहे.



