अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
अमरावती :- ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अंजनगाव सुर्जी येथील एका व्यक्तीकडून तब्बल २२ लाख ६८ हजार १०० रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणपतीनगर येथील अजय सुखलाल गौर (वय ५२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अंजनगाव सुर्जी पोलिसांनी यालीनी गुना, गौरव दुआ, एससीएसआयएल अॅडमिन आणि अकाऊंट मॅनेजर या चार संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
फेसबुकवरील लिंकने सुरू झाली फसवणूक…
३० सप्टेंबर २०२५ रोजी फेसबुकवर आलेल्या एका लिंकवर क्लिक केल्यानंतर अजय गौर हे SCSIL नावाच्या कथित प्रोफेशनल ट्रेडिंग ग्रुपशी जोडले गेले. काही दिवस ग्रुपमधील कार्यपद्धती पाहिल्यानंतर त्यांचा संपर्क को-ऑर्डिनेटर यालीनी गुना हिच्याशी झाला. तिने रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घेतला व एका इन्व्हेस्टर अॅपची लिंक देऊन लॉगिन करून घेतले. सुरुवातीला अजय यांनी थोडी रक्कम गुंतवून काही नफा मिळवला. परतावा मिळाल्याचे पाहून त्यांचा विश्वास वाढला.
२५% परताव्याचे आमिष…
यालीनीने अजय यांना एका शेअर प्लॅनमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले, ज्यात एका दिवसात २५ टक्के परतावा मिळेल, असे सांगण्यात आले. संशय आल्यावर अजय यांनी ग्रुपमधील एका महिला सदस्याशी संपर्क साधला. तिने स्वतःला यशस्वी गुंतवणूकदार म्हणून दाखवून विड्रॉलच्या रसीदाही पाठवल्या, ज्यामुळे त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. याच विश्वासामुळे अजय यांनी मोठी रक्कम गुंतवण्याचा निर्णय घेतला.
गुंतवणूक आयपीओ प्लॅनमध्ये ‘आपोआप’ ट्रान्सफर…
२८ ऑक्टोबर २०२५ रोजी शेअर्स विकत घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी विक्री करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सिस्टममध्ये आयपीओ प्लॅन सुरू असल्याचे सांगत त्यांची संपूर्ण गुंतवणूक आपोआप आयपीओमध्ये हलवण्यात आली. त्यानंतर आरोपींनी त्यांना इतर शेअर्स खरेदी-विक्रीसाठी मार्गदर्शन करण्याचे नाटक केले. ७ नोव्हेंबर रोजी शेअर्स विकण्याची परवानगी मागितली असता, ‘थांबा’ असे सांगण्यात आले. शेवटी विड्रॉल रिक्वेस्ट टाकल्यावर ती रिजेक्ट करण्यात आली. अजय गौर यांनी यालीनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळेना. त्यानंतर त्यांना या व्यवहारामागे सुनियोजित ऑनलाईन फसवणूक झाल्याचे समजले.
पोलिसांकडे तक्रार, चौघांविरुद्ध गुन्हा…
१३ नोव्हेंबर रोजी अजय गौर यांनी पोलिसांत लेखी तक्रार दिली.
अंजनगाव सुर्जी पोलिसांनी • भादवी कलम 405, 420, बीएनएस कलम 316(2), 318(4), आय टी अॅक्ट कलम 66(सी ), 66(डी) कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

