Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — आदिवासी महिला बचत गटाचे बॅंक खाते सोडून अनुदान...

ब्रेकिंग न्यूज… — आदिवासी महिला बचत गटाचे बॅंक खाते सोडून अनुदान जमा केले चिमूरच्या श्रीकृष्ण बँकेत!”एकात्मिक आदिवासी कार्यालयाचा संतापजनक प्रताप…. — चिमूर पोलिसांच्या चौकशीकडे लक्ष!..

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

       एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

         प्रकल्पांतर्गत न्यूक्लियस बजेट योजनेतून खुटाळा येथील आदिवासी महिला बचत गटाला चार लाख रुपयांचे डीजे अनुदान मंजूर करण्यात आले. 

        मात्र बचत गटाचे खाते को-ऑपरेटिव्ह बँक शाखा मोटेगाव येथे असताना,अनुदानाचा धनादेश श्रीकृष्ण बँक,चिमूर येथे संबंधितांनी जमा केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

         गटाच्या नऊ सदस्यांना विश्वासात न घेता अध्यक्ष शीतल अमरदास गायकवाड व सचिव वर्षा सहदेव गायकवाड यांनी अनुदानाची रक्कम परस्पर उचलल्याची तक्रार चिमूर पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

        खुटाळा येथील अकरा महिलांनी दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या बचत गटाच्या नियमित सभा होत होत्या,खाते व लेखा व्यवहार पारदर्शकपणे चालत होते. 

          मात्र,अनुदान मंजूर झाल्याची माहिती गटातील सर्व सदस्यांना न देता,योजनांतर्गत धनादेश आणण्यासाठी अध्यक्ष व सचिव यांनी बचत गटाच्या महिला व्यतिरिक्त इतर महिलांना नागपूर नेले असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर खडबळ माजली.

         हा धनादेश बचत गटाचे अधिकृत खाते असलेल्या को-ऑपरेटिव्ह बँकेत जमा न करता श्रीकृष्ण सहकारी बँक,चिमूर येथे वळविण्यात आल्याचे पुढे आले.या आर्थिक व्यवहाराबाबत कोणतीही सभा घेतली नाही,तसेच सदस्यांना माहिती देण्यात आली नाही, असा आरोप महिलांनी केला आहे.

पोलिसात तक्रार….. 

         खुटाळा येथील आदिवासी महिला बचत गटाच्या महिलांना सदर धनादेश प्रकरणाबाबत चिमूर प्रकल्प अधिकाऱ्यांची मौन भूमिका दिसून आली. 

         सदर अधिकाऱ्यांच्या मौन भुमिका प्रकारामुळे फसवणुकीची शंका निर्माण झाल्याने गटातील सदस्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात धाव घेतली होती.

         मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदस्यांनी थेट चिमूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.

       या प्रकरणात पूजा श्रीरामे,निर्मला मसराम,मयुरी सावसाकडे,प्रणाली गायकवाड,यामिना गायकवाड,कौशल्या गायकवाड,सुनीता मसराम आणि गीता मसराम या महिलांनी पत्रकार परिषद घेऊन “आमच्या मेहनतीचा व सरकारी योजनेचा गैरवापर झाला आहे” अशी खंत व्यक्त केली.

       अनुदानाचे धनादेश दुसऱ्या बँकेत जमा होणे म्हणजे केवळ आर्थिक शिस्तीचा भंग नव्हे,तर आदिवासी महिलांसाठीच्या योजनांवरच गंडा घालण्याबाबतचा प्रश्न आहे. 

       सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई व्हावी,अशी मागणी आदिवासी बचत गटाच्या अन्यायग्रस्त महिलांनी केली आहे.

बाॅक्स….

         आदिवासी महिला बचत गट खुटाळा यांची तक्रार प्राप्त झाली असून याबाबत चौकशी सुरु आहे.

        दिनेश लबडे

ठाणेदार पोलीस स्टेशन चिमूर