राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊ दे – हर्षवर्धन पाटील…  — रुईच्या बाबीर देवाला घातले साकडे… — हर्षवर्धन पाटील यांनी घेतले बाबीर देवाचे दर्शन…

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

               राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, तसेच राज्यातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील रुई येथील प्रसिद्ध श्री बाबीर देवाला बुधवारी (दि.15) साकडे घातले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी यात्रेच्या निमित्ताने बाबीर बुवाची पूजा केली व दर्शन घेतले.

              बाबीर बुवा देवस्थान हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. बाबीर देवाचे मंदिर व परिसराच्या विकासासाठी आगामी काळातही लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

         बाबीर बुवा हे आपले सर्वांचे श्रद्धास्थान आहे. लहानपणापासून प्रत्येक वर्षी मी इथे यात्रेसाठी येऊन बाबीर देवाचे आशीर्वाद घेत आहे. बाबीर देवाचे दर्शन घेतल्यावर नेहमी प्रेरणा मिळते व त्यापासून निर्माण झालेला उत्साह कायम ऊर्जा देत असतो, असे गौरवोद्गार यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

      यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी यात्रेसाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांशी संवाद साधला. आपले सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबीर देवाची यात्रा दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने दक्ष रहावे, अशी सूचनाही हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी केली.

      यावेळी बाबीर देवस्थान ट्रस्टच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. रुई येथील राज्यभर प्रसिद्ध असलेल्या बाबीर देवाच्या यात्रेचा बुधवार हा मुख्य दिवस आहे. या निमित्ताने आयोजित बाबीर यात्रा महोत्सवातील गजी ढोल नृत्य स्पर्धेदरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी गज ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. यावेळी विलासराव वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.