चिरफाड
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
अधिकारी व लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार आणि खासदार हे जनसेवक असतात.यांना अवैध धंद्यातंर्गत आणि इतर प्रकारे भ्रष्टाचारातंर्गत रुपये कमविन्यास कायदेशीर मज्जाव आहे.
तद्वतच अधिकारी व लोकप्रतिनिधी हे जनसेवक असल्याने त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात नागरिकांचे संरक्षण करणे अगत्याचे आहे.
परंतु आजच्या वर्तमान काळातले अधिकारी व लोकप्रतिनिधी हे अतीलोभात पडले असल्याने स्वत:च्या कार्यक्षेत्रात सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांना त्यांनी रान मोकळे करून दिले असल्याचे अख्या महाराष्ट्र राज्यातील चित्र आहे.
आमदारांच्या कार्यकर्त्यांसह इतर इसमांना अवैध धंद्यांना अनुसरून बनावट दारु,देशी दारु आणि गावठी दारूची विक्री करण्यासाठी आणि सट्ट्यांची अड्डे चालविण्यासाठी खेडेपाडे खुले करुन देण्यात आले आहेत.
याचबरोबर जुगारांची अड्डे सुरु ठेवण्यासाठी,वाळूचा व मुरुमाचा अवैध व्यवसाय खुलेआम सुरू राहण्यासाठी,वेश्याव्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यासाठी, अधिकारी आपल्या कर्तव्याला पणाला लावताना दिसतात,यासारखी लाजीरवाणी बाब दुसरी असू शकत नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यासह महाराष्ट्र राज्यातील,”बऱ्याच अधिकाऱ्यांचा अवैध धंद्याच्या माध्यमातून भ्रष्टाचारातंर्गत अमाप रुपये कमविण्याकडे कल असल्याने ते अवैध धंद्यांकडे अजिबात लक्ष देत नाही,असे दिसून आले आहे.
त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे बंद करु नये यासाठी लोकप्रतिनिधींचा अप्रत्यक्षरीत्या सहभाग किंवा प्रत्यक्ष सहभाग असू शकतो.यामुळे आमदार हे स्वत:च्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे जोमाने सुरू ठेवण्यास सक्रिय असू शकतात असे म्हणणे अनुचित ठरु नये…
जर अधिकाऱ्यांचा,आमदारांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अवैध धंद्यात सहभाग नसता तर आपल्या सचोटीला,आपल्या जनसेवक कर्तव्याला ओळखत त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे सुरु ठेवलेच नसते!…
तद्वतच अधिकारी व लोकप्रतिनिधी हे,”अवैध धंद्यांना अनुसरून,…”लोकसेवा,…अशी नवीन व्याख्या करीत असतील आणि असाच लोकसेवकाला अनुसरून स्वत:च्या कार्यालयात खुर्च्या तोडण्याबाबतचे उत्तम कर्तव्य समजत असतील तर अशा आमदारांना व अधिकाऱ्यांना त्यांची खरी जागा,”महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,संबंधित सर्व मंत्री,महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव,महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक,यांनी दाखवली पाहिजे आणि योग्य दिशासाठी त्यांना जनसेवक या अधिकारातंर्गत पदातून मुक्त केले पाहिजे, (बडतर्फ) याच मताची जनता आहे.
माननीय सुप्रीम कोर्टाचे अनेक जजमेंट आहेत,डॉ.सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध डॉ.मनमोहन सिंग,तसेच राजीव रंजन विरुद्ध आर विजयकुमार,तसेच प्रकाश सिंग बादल विरुद्ध पंजाब राज्य,तसेच शंभुनाथ मिश्रा विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य मध्ये जजमेंट दिले आहे कि,लोकसेवकानी पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून,स्वतःच आर्थिक लाभ घेऊन भ्रष्टाचार करीत असतील तर त्यांना संरक्षण मिळू शकत नाही….
प्रश्र्न हा पडतो की,सर्व स्तरावर भ्रष्ट यंत्रणा असेल आणि ते एकमेकांचे संरक्षण करण्यासाठी पुरक ठरत असतील तर,”सामान्य नागरिकांना अवैध धंद्याच्या जाळ्यातून,वाचवेल तरी कोण?
“लाखो नागरिकांना अवैध धंद्याच्या माध्यमातून आर्थिक कंगाल करणे,त्यांना सर्व प्रकारचे समस्याग्रस्त बनवने,त्यांना बरबाद करणे,हा गोरखधंदा अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी सुरु केला असेल तर त्यांना पदावरून हटवलेच पाहिजे.
याचबरोबर नागरिकांनी स्वत:च्या,कुटुंबीयांच्या,”आजच्या आणि उद्याच्या भविष्यासाठी,अवैध धंद्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या समर्थन देणाऱ्या लोकप्रतिनिधींचे कायमचे दारे बंद केली पाहिजेत,”अधिकाऱ्यांचा कायदेशीर बंदोबस्त केला पाहिजे….
अधिकारी हे अवैध धंद्याकडे पाठ फिरवित असतील आणि अवैध मार्गाने रुपये कमविन्यासाठी कर्तव्याला व अधिकाराला गुंडाळून ठेवत असतील तर त्यांना दुसऱ्यांवर कारवाई करण्याचा काय अधिकार?
लोकप्रतिनिधी व अधिकारी हे उत्तम आणि निरव्यशनी समाज घडविण्यासाठी असतात.त्यांचा सार्थकी वाटा समाज घडविण्यासाठी असावा,”म्हणूनच त्यांना जनसेवक सन्मान हा,पदाची शपथ घेतानाच मिळाला आहे.
या जाणीवेचे विस्मरण ते स्वत: करुन घेत असतील तर त्यांना समाज चांगले कसे म्हणणार?….
म्हणूनच भ्रष्टाचाराची जडच अधिकारी व लोकप्रतिनिधी असतात,हे सत्य नाही काय?
याचबरोबर संतमहापुरुषांचे व इतर प्रकारचे कार्यक्रम घेताना भ्रष्ट्र रुपयांच्या ओझात दबलेले नागरिक सुध्दा स्वत:सह समाजाचे अतोनात नुकसान करतात,हे त्यांना केव्हा कळेल?
कुठल्याही कार्यक्रमाला एखाद्या व्यक्तीकडून वारंवार रुपये मागितले तर स्वाभिमानाने त्याच्या चुकीच्या कार्यपध्दती विरोधात बंड करता येत नाही.यामुळेच समाज,समाजातील नागरिक हे लाचार झालेले असतात.लाचार समाज आणि लाचार नेतृत्व हे बिनबुडाचे चेंडू असतात.त्यांना जसे घुमवले तसेच ते घुमतात…
तद्वतच प्रत्येक कार्यक्रमाला रुपये देणारा व्यक्ती हा भ्रष्ट्र मार्गाने रुपये कमवणारच,हे वास्तव आहे!..
परंतु संत महापुरुषांच्या जयंतीचा व स्मृतिचा कार्यक्रम हा भ्रष्ट्र रुपयांच्या माध्यमातून करणे म्हणजे आपण त्यांच्या महान कार्याला व युगप्रवर्तक विचारांना नाकारणे होय,हे समाज नेतृत्वाला आणि सामाजातील नागरिकांना कळायला पाहिजे…
संतमहापुरुषांचे व इतर कार्यक्रम उत्साहात व आनंदमय वातावरणात जरुर पार पाडले पाहिजे,पण ते समाजाच्या बलावरच!
तेव्हाच लोकप्रतिनिधी,अवैध धंदेवाईक,अधिकारी हे बहुजन समाजाच्या खऱ्या ताकदीला ओळखून कायदेशीर कर्तव्य पार पाडतील व बहुजन समाजाच्या हितासाठी कर्तव्याचा विस्तार वेळोवेळी करतील…
समाजातील नागरिकांना अवैध धंद्याच्या डोहात बूडून मारायचे नसेल आणि समाजाला बरबाद करायचे नसेल तर नागरिकांनी,”लोकप्रतिनिधी-अधिकारी-अवैध धंदेवाईकांच्या विरोधात वारंवार बंड केले पाहिजे आणि त्यांच्याकडून कार्यक्रमाला रुपये घेणे बंद केले पाहिजे…
तरच बहुजन समाजाचे नेतृत्व व बहुजन समाज स्वाभिमानी!
बहुजन समाजातील नेतृत्वानी हे लक्षात घेतले पाहिजे की,”समाज लाचार लवकर बनतोय,परंतु स्वाभिमानी समाज घडविण्यासाठी पिढ्यांनपिढ्या दर पिढ्या संघर्ष करावा लागतो….



