दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट (सप्टेंबर २०२५) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ३ लाख १४ हजार ६६६ विद्यार्थी बसले होते.
या पार्श्वभूमीवर आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु.संस्कृती बाजीराव नवले हिने इंटरमिजिएट परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत १५ वा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे अशी माहिती संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी दिली आहे.
श्री ज्ञानेश्वर विद्यालय हे या परीक्षेचे केंद्र असून, याच प्रशालेतील विद्यार्थिनीने मिळवलेल्या या यशामुळे आळंदीच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेला नवा गौरव प्राप्त झाला आहे. संस्कृतीला कलाशिक्षक दत्तात्रय मारुती वंजारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
ज्ञानेश्वर विद्यालयातील अनेक विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या तालुका व जिल्हास्तरावरील कला परीक्षांत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. या उल्लेखनीय यशाबद्दल कु. संस्कृती बाजीराव नवले व कलाशिक्षक दत्तात्रय वंजारी यांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर तसेच प्राचार्य किसन राठोड यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



