कराडमध्ये ईव्हीएम जनजागृती मोहीम रोखली..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

            वृत्त संपादीका 

        कराड:- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात निवडणूक विभागाच्यावतीने जनजागृती मोहीम सुरू होती.

       यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांनी ईव्हीएम मशीनबाबत आक्षेप घेत जनजागृती रथ रोखला.

        तहसीलदार दोन्तुल्ला चंद्रा व नायब तहसीलदार राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा करत निवडणूक विभागाकडून संयुक्त बैठकीचे आश्वासन दिल्यावर वातावरण निवळले.

      लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.

        यामध्ये कराडमध्ये डिजिटल स्क्रीन असलेल्या वाहनांच्या माध्यमातून ईव्हीएमचा वापर व उपयुक्ततेविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

      शनिवारी दुपारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ईव्हीएम मशीनच्या जनजागृतीचा कार्यक्रम सुरू असताना भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे,निसार मुल्ला,विजय काटरे,इम्रान मुल्ला आदी पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर ईव्हीएम मशीनबाबत भडिमार केला. त्यांना समर्पक उत्तरे देता न आल्यामुळे जनजागृती मोहीम रोखण्यात आली.

        त्यानंतर तहसीलदार चंद्रा,नायब तहसीलदार राठोड,तलाठी सचिन निकम, निवडणूक कर्मचारी,पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रांताधिकाऱ्यांसमवेत या संदर्भात बैठकीचे आश्वासन दिले.

       भारत मुक्ती मोर्चाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देत ईव्हीएम मशीनबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

      तसेच जोपर्यंत ईव्हीएमबाबत निवडणूक विभाग पारदर्शक माहिती देत नाही,तोपर्यंत जनजागृती मोहीम थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.