कार्तिकी यात्रेत आळंदी देवस्थानला स्वकामचे मोलाचे सहकार्य… 

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 727 व्या संजीवन समाधी सोहळ्यात आळंदी देवस्थानला मोलाचे सेवा योगदान स्वकाम सेवा मंडळ या स्वयंसेवी संस्थेचे लाभले आहे. माऊली मंदिर परिसरातील स्वच्छता असो वा प्रसाद वाटप, देणगी स्वीकारणे, भाविकांना पाणी वाटप असो वा आलेल्या देणगीचे मोजमाप, अशी कित्येक कामे या संस्थेच्या स्वयंसेवकानी नि:स्वार्थ भावनेने स्वकाम सेवेच्या स्वयंसेवकांनी पार पाडली असे मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर यांनी सांगितले.

         ‘सोडा अंहकार मिळवा आनंद’ हे ब्रीद घेऊन ही संस्था गेली 28 वर्षे समाजकार्य करत आहे. कुठलेही शासकीय अनुदान नाही वा कोणत्याही मंदिराची देणगी, आर्थिक मदत नाही. जे काम करायचे त्या कामाचा खर्च हा आपापसात वर्गणी काढून जमा करायचा, हा या मंडळाचा नियम. मंडळाचे संस्थापक डॉ.सारंग जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुनील तापकीर हे काम पाहतात, तर महिलाध्यक्षा म्हणून आशाताई तापकीर या काम पाहतात. त्यांना धनाजी गावडे, सुभाष तांगडे, कैलास सरोदे, अशोक सुरुंग, सुभाष बोराटे, अरुण देवकाते, आत्माराम सांडभोर, अनुकुमार दिंडाळ, प्रकाश ठाकूर, भगवान घोलप, किशोर तुर्हे, अंकुश बनकर, संदीप बर्गे, गोपाळ फुलवरे, संभाजी चौधरी, करुणा लोंढे यांचे सहकार्य लाभत आहे. यंदाच्या वारीत सुमारे 400 स्वयंसेवकांनी सेवा बजावली, यात 150 पुरुष व 200 महिलांचा समावेश होता. जालना येथील 53 जणांची तुकडीदेखील सेवेसाठी आली होती.