दिनेश कुऱ्हाडे
वृत्त संपादिका
आळंदी – आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आज जोरदार प्रतिसाद मिळाला. मंगळवार, दि.13 नोव्हेंबर रोजी एकूण तीन उमेदवारांकडून चार नामनिर्देशनपत्रे दाखल झाली असून त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश पंढरीनाथ कुऱ्हाडे हे अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत.
आळंदी नगरपरिषद निवडणुकीसाठी 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सुरू राहणार आहे. आजच्या अर्ज दाखल प्रक्रियेत नगराध्यक्षपद आणि सदस्यपदासाठी एकूण चार अर्ज दाखल झाले.
नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रकाश पंढरीनाथ कुऱ्हाडे यांनी अर्ज दाखल केला आहे. प्रकाश कुऱ्हाडे हे आळंदीतील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत निवडणुकीला चुरस आणली आहे. याचबरोबर अपक्ष उमेदवार म्हणून राजाराम रतन चौधरी यांनीही नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन दाखल केले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत आता पक्षीय आणि अपक्षीय उमेदवारांची थेट लढत रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक 5 (जागा अ) मधून रोहन नंदकुमार कुऱ्हाडे यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी एक अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर तर दुसरा अपक्ष उमेदवार म्हणून दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रभागातही बहुकोनी लढतीचे संकेत मिळत आहेत.
आत्तापर्यंत दाखल झालेल्या एकूण नामनिर्देशनपत्रांची संख्या चार असून पुढील काही दिवसांत आणखी उमेदवार आपले अर्ज दाखल करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ज दाखल प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडत आहे. सर्व उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह नियमांचे पालन करून अर्ज सादर केले आहेत.
आळंदी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), भाजप या प्रमुख पक्षांमध्ये चुरस अपेक्षित आहे. नगराध्यक्षपदासह एकूण 21 सदस्यपदे असलेल्या या नगरपरिषदेसाठी येणाऱ्या काही दिवसांत राजकीय वातावरण तापणार आहे. आळंदीतील स्थानिक राजकारणावर लक्ष केंद्रित करत प्रकाश कुऱ्हाडे यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आपली निवडणूक मोहिम वेगात नेण्याची चिन्हे दिसत आहेत.



