आधी दोन देशात युद्ध होते,मग जगातील काही देश याच्या तर काही देश त्याच्या पाठीशी उभे राहतात,स्वतकडील शस्त्र संपती सैन्याची मदत पुरवितात,यातून काही देशाची एक फळी तर काही देशाची दुसरी फळी निर्माण होऊन जागतिक युद्ध पेटते,अशी महायुद्धे या पृथ्वीतलावर आत्तापर्यंत दोन झाली. ज्यांना आपण इतिहासात जागतिक महायुद्धे म्हणून ओळखतो.
दोन देशांचे युद्ध असो की,महायुद्धे असोत,ही का होतात ? यांचा उद्देश काय ? ही कुणाची असतात ? कुणासाठी ही युद्धे होतात ? असे चिंतन होण्याची खरी गरज आहे.गरज यासाठी की,युद्ध ही गोष्ट मानवासाठी,निसर्गासाठी हितावह नाही,कारण यातून फायदा उपयोग तर काहीच नाही,मात्र मानवांची जीवहानी आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर हानी होते,युद्धाचा फायदा तर काहीच नाही,मात्र नुकसान निश्चितच आहे.हे माहित असताना पण युद्धे का होतात ? होतात की घडवून आणल्या जातात ? याचा पण विचार केला पाहिजे.
माझ्या मते युद्धे ही आपोआपच होत नाहीत,त्यास काही निमित्त लागते,ते निमित्ताने युद्धास तोंड फुटते.कधी कधी निमित्त पण घडवून आणले जातात.जसे की, एखाद्यास एका सोबत भांडण करावेसे वाटले,त्यामागे काही कारण पण आहे,पण ज्याच्याशी भांडण करायचे आहे,तोच वाटेला येत नसेल तर हटकून त्याच्या पायावर पाय देऊन काळ काढायची आणि भांडण सुरू करायचे ,असे पण निमित्त उभे करायचे,असा पण काहीजण उद्योग करतात.काहीजण स्वतःच कारण नसताना बाँब ठोकून लोक जमा करतात आणि आपल्या विरोधकाने मला मारले असे खोटे सांगतात,हे पण निमित्ताचा एक प्रकार आहे.निमित्त खोटे असो की खरे,हा महत्वाचा विषय नाही,महत्त्वाचे हे की,भांडणाचा उद्देश आणि कारण पाहणे,तपासणे हे महत्वाचे आहे.
अतिरेकी हल्ले खरे की खोटे हा विषय होऊ शकतो,पण त्यापेक्षाही हे निमित्त आहे आणि यामागे काही उद्दिष्ट आणि कारण आहे,ते कोणते ? ते समजून घेऊन त्यावर उपाय करणे,हाच खरा उपाय होऊ शकतो,अन्यथा रोगाचे लक्षण न करणारा बुद्धू डॉक्टर रोग बरा तर करू शकणारच नाही,पण त्याच्या अपुऱ्या ज्ञानाने रोग्याचा जीव पण जाऊ शकतो.
आपण एक देशाचे जबाबदार नागरिक म्हणून जरा विचारक तर्कशील सत्यवादी बनून ” युद्ध ” या विषयाकडे पहिले पाहिजे.युद्धे का होतात ? ही युद्धे कुणाची ? आणि कुणासाठी ? असे प्रश्न आपण निर्माण करून या प्रश्नाची उत्तरे शोधली की,मग युद्धामागचे सत्य सापडेल,उघड होईल.
सत्य हे की,युद्धे दोन देशांची जरी असली तरी ती त्या त्या देशातील जनतेची नसतात,तर त्या दोन देशांच्या राजकारण्यांची असतात.सत्ता मिळवण्यासाठी किंवा मिळवलेली सत्ता टिकवण्यासाठी.दोन देशाचे युद्ध असते,भूभागासाठी.शेजारी राष्ट्राचा भूभाग घेण्यासाठी आणि आपला भूभाग सुरक्षित राखण्यासाठी.याचा अर्थ ही लढाई असते,दोन राजाची ( तो लोकशाहीचा असेल की घराणेशाहीचा ) सत्ता संपती साठीची.
जगातील देशातील जनता यांचे आपापसात काहीच भांडण नसते,देशांच्या सीमा नसत्या तर उलट सारे जग विभागलेले दिसले नसते,एकच दिसले असते.सीमांची गरज ही जनतेची नाही तर राजांची आहे,केवळ स्वार्थासाठी.स्वतःचे वर्चस्व,सुख,वैभव,ऐशारामी जीवन जगण्यासाठी,सर्व काही कष्ट परिश्रम न करता आयतेच मिळण्यासाठी,मूठभर स्वार्थी लोकांची ही महत्वाकांक्षा साठीच देश निर्मिती,मिलिटरी, सीमा निर्माण करून युद्धे करीत बसणे हा यांचा धंदाच आहे.जसे पुरोहितांचा देवपूजा करून पोट भरण्याचा ऐतेखण्याचा धंदा,तसेच या मूठभर अतिश्रीमंत ,स्वार्थी,ऐतखाऊ ,शोषक वर्गाचा युद्ध हा धंदाच होय.हे आधी समजून घेऊ या.कोणत्याही देशातील कोणत्याही जनतेची ” युद्ध ” ही गरज नसते.मागणी नसते.त्यांची मागणी असते केवळ रोजगार,नोकरी आणि महागाई ,भ्रष्टाचार हटविण्याची, अन्न,पाणी,यांची.त्यांना कोणत्या धर्माचा ,कोणत्या जातीचा,कोणत्या देशाचा ,कोणत्या वर्गाचा माणूस सत्तेवर असावा? याशी जनतेचे काही देणे घेणे नसते,त्याची किमान इच्छा फक्त सुखी व शांतीपूर्ण जीवन जगणे हीच त्यांची खरी गरज असते.
धर्माची जातीची गरज असते सत्ताधाऱ्यांना आपली सत्ता टिकवण्यासाठी. सत्ताधारी आपले बाहुले बनून ठेवण्याची गरज असते भांडवलदार यांची.जगातील भांडवलदारांचे संघटन असते,ते नफा कमावण्यासाठी त्यांना जगात अनेक देश असावेत,आणि त्यांच्यात सतत भांडणे व्हावीत,असावीत,नसलेतर लावावीत आणि आपल्या कारखान्यातील वस्तूंची विक्री सर्व देशात करावी,त्यातून नफा कमवावा,आपण निर्माण केलेली लढाईचे शस्त्र आणि तंत्रद्न्यान विकून पैसा आणि नफा कमविणे केवळ या स्वार्थासाठी हे देश,या सीमा,ही युद्धे,ही क्षपनास्त्रे आहेत.
” लढाई ” ची मागणी किंवा इच्छा ही जनतेची कधीच नसते,त्यांची ही गरज नव्हे.त्यांची गरज आहे फक्त अन्न,पाणी,औषधी,शिक्षण,उद्योग,व्यवसाय,आणि आपल्यातील क्षमता आणि कौशल्य यास समान संधी मिळावी,आणि स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी समान दर्जा मिळावा.यासाठीच सत्तेवर कोण असावे ? याचा विचार जनता ,मतदार करीत असतो. युद्ध करण्यासाठी राजकार्त्यांना निवडून देत नाही.तर युद्ध टाळण्यासाठी,अतिरेक्यांना,गुन्हेगारांना शोधून काढून त्यांना जशाच तशी शिक्षा द्यावी,एव्हढेच अपेक्षा जनतेची असते.लढाईच्या नावाने आपल्या असो की शत्रूच्या देशातील निष्पाप जनतेचा जीव घेण्याची मागणी जनतेची नसते.
निष्पाप जनतेच्या जीवाशी खेळून आपला स्वार्थ साधणे हे दोन्हीही देशाच्या राजकार्त्यांची गरज असते.खरे तर संवेदनाहीन,माणुसकी नसलेले हे राजकरतें च युद्ध घडवितात.जनतेला या युद्धाशी काहीच देणे घेणे नसते.
सीमेवरचे संरक्षण यांना जेव्हढे महत्वाचे वाटते तेव्हढे देशांतर्गत संरक्षण महत्वाचे वाटत नाही,तसे असते तर हे अतिरेकी हल्ले झालेच नसते.अजूनही होतच राहतील,कारण याचा फायदा त्यांना होतो.जनतेचा मात्र हकनाक जीव जातो,केवळ यांच्या स्वार्थापायी.



