भीमजयंती एक जागतिक वैचारिक उत्सव…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती आपण साजरी करीत आहोत.

         १४ एप्रिल हा मंगल दिन म्हणजे जागतिक विद्वान विश्व वंदनीय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस होय. जगातील १०० पेक्षा जास्त देशामध्ये डॉ.आंबेडकरांचा जन्मदिन मोठ्या उल्हासात साजरा केला जातो.म्हणून हा दिवस ‘जागतिक वैचारिक उत्सव दिन’ म्हणूनच संबोधला गेला पाहिजे,असे माझे मत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मौलिक विचार हे जगाने स्वीकारले आहेत.हा दिन म्हणजेच त्यांच्या विचारांचा गौरव दिन होय. 

         बीबीआज जागतिक स्तरावरील देश डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणास्थानी व स्फूर्तीस्थानी मानतात.या महान विद्वत्त्यास उल्लेखतांना ते वेगवेगळ्या उपाधीने संबोधतात.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समर्थ ज्ञानी, सत्कर्मी, विवेकी शुर वीर, समाज सुधारक, वकील, प्राध्यापक, सामाजिक क्रांतीचे न्यायप्रिय प्रवर्तक,मानवंश शास्त्रज्ञ, तत्त्ववेता, जागतिक किर्तीचे बुद्धीमान युद्धवीर, मुरब्बी राजकारणी,मंत्रीपद त्यागणारेबाणेदार विधीमंत्री,कर्तबगार मजूरमंत्री,बांधकाम मंत्री,एक महान अर्थतज्ञ, एक धर्मवीर, राष्ट्रहित चिंतणारे थोर राष्ट्रभक्त, आणि भारतीय राज्यघटनेचे श्रेष्ठ शिल्पकार,एक शब्दात सांगायचे झाले तर या पृथ्वीतलारील असामान्य एक महामानव होय.

 उपाधीच कमी पडतील असे व्यक्तीमत्व.

           आँक्सफर्ड विद्यापीठाने डॉ.आंबेडकरांना ‘मेकर्स आँफ द युनिव्हर्स’ मध्ये चौथ्या क्रमांकावर मानांकन दिले.तर अमेरिकेत ‘१४ एप्रिल’ हा दिन ‘शिक्षण दिन’ म्हणून साजरा केला जातो. कँनडात हा दिन ‘समता दिन’ म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने ‘पायोनियर आँफ द युनिव्हर्स’ म्हणजे ‘विश्वाचा प्रणेता’ संबोधले. कँनडात ब्रिटीश कोलंबियाने ‘वर्ल्ड साईन आँफ इक्वँलिटी’ म्हणजेच’ समतेचे जागतिक प्रतिक’हा सन्मान जाहीर केला.तर अमेरिकेने त्यांना ‘ज्ञानाचे प्रतिक’ म्हणून संबोधले.ही बाब भारतीयांसाठी गौरवशाली मानावी लागेल.

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेच्या महासागरात एक नजर टाकली तर त्यांच्या वैचारिक पातळीस आपणास स्पर्शून जाता येईल.

           डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणापासूनच त्यांच्या जीवनातील महत्त्वाची घटना त्यांना महामानव म्हणून सिद्ध करीत गेली. नोव्हेंबर १८९६ पासून त्यांनी शिक्षणास सुरुवात केली आणि पहिल्याच प्रयत्नात मँट्रीक व बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याकाळी बहुजन समाजात एक विक्रम उभा केला. पुढील शिक्षणासाठी प्रसिद्ध विद्यापीठात परदेशामध्ये गेले. तेथे त्यांनी एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी.,डी. एस्सी.,व बार-अँट-लाँ या अत्युच्च पदव्या संपादन करून जगासमोर विद्वत्तेचा विश्वविक्रम उभा केला. त्याबरोबरच त्यांनी अत्यंत महत्त्वाचे लेखन केले. की ज्यामुळे त्याचा फायदा जगाला घेता आला.

           १९३६ मध्ये जातीचा संपूर्ण नाश (Annihilation of caste) हा ग्रंथ लिहिला. आणि जातीय विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हिंदुस्थानचे दोन स्वतंत्र व परस्परविरोधी राष्ट्रांच्या रुपाने विभाजन होऊ नये. हा सावधानतेचा इशारा म्हणून १९४० मध्ये Thoughts on Pakistan हा ३८० पानांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ मुंबई येथे प्रकाशित झाला. त्याचीच दुसरी आवृत्ती फेब्रुवारी १९४५ मध्ये पाकिस्तान किंवा भारताची फाळणी (Pakistan or partition of India) या नावाने हा ग्रंथ प्रकाशित झाला.

           १९४२ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात त्यांनी आकाशवाणीवर भाषण दिले त्याचा विषय होता (Why Indian labour is Determined to win this war?) हुकुमशहा हिटलर व मुसोलिनी यांचा पराभव व्हावा आणि हिंदुस्थानात स्वातंत्र्य, समता,बंधुता या तीन तत्त्वावर आधारित लोकशाही राज्य प्रस्थापित व्हावे म्हणून हिंदुस्थानी कामगार वर्ग जास्तीत जास्त श्रम करीत आहे,असा त्याचा आशय होता.

            १९४३ मध्ये रानडे यांच्या जन्म दिनाचे अध्यक्षीय भाषण केले. त्या भाषणाचे ८५ पानांचे (Ranade, Gandhi and Jinah) हा ग्रंथ प्रकाशित झाला. तर १९४३ मध्येच श्री. गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती (Mr.Gandhi The Emancipation of the Untouchables) हा ७५ पानांचा ग्रंथ प्रकाशित झाला. १९४५ मध्ये ‘दि आँल इंडिया शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनचे’ अधिवेशन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

           त्यात त्यांनी’जातीय तिढा आणि तो सोडवण्याचा मार्ग’ या विषयावर भाषण दिले. ते इंग्रजी भाषेत ३१ पानांचे (Communal deadlock and A way to solve it) या नावाने ग्रंथ प्रकाशित झाला. १९४५ मध्येच मुंबईच्या ठक्कर अँड कंपनीने (What Gandhi and congress have done to the Untouchables) हा ३८३ पानांचा ग्रंथ प्रकाशित झाला.

          १९४६ मध्ये (Who were the shudras?) हा २७५ पानांचा ग्रंथ प्रकाशित झाला. १९४७ मध्ये states of minorities हा ८० पानांचा ठक्कर अँड को.लि.या प्रकाशनाने प्रकाशित केला.१९४७ मध्ये पूर्ण झालेला (The Untouchables-Who were they and Why they become Untouchable) हा १५५ पानांचा ग्रंथ प्रकाशित झाला.

             डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भाषिक आणि भौगोलिक या विषयावर मौलिक विचार त्यांनी (Maharashtra As a Linguistic province-Statement submitted to the linguistic provinces commission) हे ४० पानांचे पुस्तक प्रकाशित झाले. १९५१ मध्ये त्यांनी दोन ग्रंथ लिहायला घेतले. ते म्हणजे (Buddha and Karl marx) आणि दुसरा (Revolution in ancient India) १९५३ मध्ये त्यांना उस्मानिया विद्यापीठाने (डॉक्टर आँफ लिटरेचर) ही सन्मानाची पदवी बहाल केली.

            १९५५ मध्ये भारतासाठी भाषावार प्रांतरचना हे राज्यकारभारासाठी कसे सुव्यवस्थित होते.त्यासाठी त्यांनी (Thoughts on Linguistic states हा ग्रंथ प्रकाशित केला. २०मे १९५६ मध्ये ‘व्हाईस आँफ अमेरिका’या अमेरिकेतील रेडिओ केंद्राने’ भारतात लोकशाहीच्या शक्यता काय आहेत? (What are the prospects of Democracy in India) या प्रश्नार्थक विषयावरडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण प्रसारीत केले. तर १९५६ मध्ये त्यांनी (The Buddha and his Dhamma) हा महान ग्रंथ पूर्ण केला. तसेच सप्टेंबर १९५६मध्ये (The riddles of Hinduism) हा ग्रंथ प्रकाशित केला.

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व ग्रंथाचे लेखन हे जवळजवळ इंग्रजीमध्येच केले आहे.

             डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानतेचे विशेष म्हणजे त्यांना एका विशिष्ट उपाधीमध्ये संबोधता येणे अशक्य आहे. त्यांचे अर्थशास्त्रीय योगदान तितकेच मौलिक आहे.या ग्रंथाद्वारे जगातील देशांना सुद्धा मार्गदर्शन होऊ शकते. त्यांच्या महत्त्वपूर्ण तीन प्रबंधाने अर्थक्षेत्रात किर्तीचे उत्तुंग शिखर गाठले आहे. ते म्हणजे (Administration and finance of east India company),भारतातील प्रांतिक व्यवहाराचा हा ग्रंथ लिहिला.(The Evaluation of provincial finance in British India) आणि हा प्रबंध इतका महत्त्वाचा ठरला. (The problem of rupee: Its Origin and its solution)१५ डिसेंबर १९२५ ला त्यांची राँयल कमिशन समोरील साक्ष गाजली.

              या साक्षीवरुन देशात सरकारच्या अखत्यारीत केंद्रीय बँक निर्माण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या चिंतनातून १ एप्रिल १९३५ ला ‘रिजर्व बँक इंडिया ची स्थापना झाली. ते मजूर मंत्री आणि बांधकाम मंत्री असताना श्रमिकांच्या विकासासाठी धोरण व विविध उपक्रम हाती घेतले.ते बहुउद्देशीय दामोदर खोरे योजना,नदी जोड प्रकल्प, बहुउद्देशीय ओरिसा नदी खोरे आणि विद्युत विकास धोरण हे महत्त्वपूर्ण आणि कधीही न विसणारे आहे.हे शेतकरी आणि कामगार यांना भरपूर फायदेशीर ठरले.

१५ आँगस्ट १९३६ रोजी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ स्थापन केला.

         १९४२ मध्ये हा पक्ष विसर्जित करून’आँल इंडिया शेड्युल्ड कास्टस् फेडरेशन’ ची स्थापना केली. तर १९५७ मध्ये सार्वत्रिक निवडणूक लढविण्यासाठी ‘रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया’ हा नवीन पक्ष स्थापन्याचा निर्णय घेतला.

सामाजिक चळवळ क्रियाशील करण्यासाठी वृत्तपत्र असणे गरजेचे होते.

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्योद्धारांच्या जीवित कार्याच्या चळवळीसाठी वृत्तपत्र मार्गाचा प्रभावशाली उपयोग केला. मुकनायक, बहिष्कृतभारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत ही त्यांची पाच वृत्तपत्रे होत. त्यांची बुद्धभुषण प्रिटींग प्रेस होती.

          शैक्षणिक क्षेत्रात समाज शिक्षित व्हावा. शैक्षणिक चळवळीस गती देण्यासाठी ८ जुलै १९४५ मध्ये ‘पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.त्यामार्फत मुंबई येथे ‘सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली आणि औरंगाबाद येथे ‘मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली.

         १४ आक्टोंबर १९५६ साली त्यांनी बौध्द धर्माची दीक्षा घेवून कोट्यावधी आंबेडकरी अनुयायांना दीक्षा देवून, प्रज्ञा,शील, करुणेचा महामंत्र दिला.तसेच शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा बहुमोल संदेश दिला.

           १५ आँगस्ट १९४७ ला भारत देश पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला.आणि या स्वतंत्र सार्वभौम देशाची राज्यघटना लिहिण्याचे महान काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आले. त्यांनी सर्व देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास केला आणि भारत देशाला एक आदर्श संविधान दिले.की भारत देशातील प्रत्येक नागरिकांना जबाबदारी, कर्तव्य आणि एकात्मतेच्या बंधनात बांधणारे बहुमोल संविधान ‘ज्याची सुरुवात ‘आम्ही भारताचे लोक..’या वाक्याने करुन ते देशाला अर्पण केले.

            २६ जानेवारी १९४९ पासून भारताचा कारभार लोकशाही पद्धतीने सुरू झाला. हि जगातील आदर्श लोकशाही ठरली.या भारतीय संविधानाने समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय देवून एकतेचा जगासमोर आदर्श ठेवला. तर प्रत्येक नागरिकांस मतदानाचा अधिकार देवून ‘एक मत एक मूल्ये’ देवून समता प्रस्थापित केली.

            सध्या लोकशाहीला ग्रहण लागले आहे.याचे मुख्य कारण आमच्यामध्ये संविधान साक्षरतेचा अभाव असल्यामुळेच.मग त्यासाठी लोकशाहीचे महत्त्व जाणण्यासाठी संविधानाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.तेव्हाच संविधाना विषयी ज्या काही अडचणी आहेत ते समजणे सोपे होईल.आणि संविधानाची महानता आमच्या लक्षात येईल.म्हणून वाचन खूप महत्त्वाचे आहे. डॉ.बाबासाहेबांच्या सर्व ग्रंथाचा अभ्यास केल्यास जगातील सर्व समस्यांचे निराकरण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यानिमित्ताने हा जयंती महोत्सव वैचारिकदृष्टीने वाचणीय झाला पाहिजे.

           डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येकक्षण समाज हितासाठी आणि देश समृद्धीसाठी अर्पण केला. त्यांचे महान विचार सर्व जगाने मान्य केले आहेत. त्यांचे अनमोल विचार जगाला त्याकाळी ,आज आणि भावी काळात मार्गदर्शन आणि प्रेरणा देत राहतील.आंबेडकरी साहित्यातून मौलिक विचार जगात पेरले गेले आहेत. म्हणूनच त्यांची जयंती जगभर उल्हासात साजरी केली जाते.

          आंबेडकरी अनुयायांनीसुद्धा भीमजयंती नाचून नाही तर वाचून जयंती साजरी केली पाहिजे. तीच डॉ. बाबासाहेबांना सुद्धा अभिप्रेत होती.

 या जयंतीदिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन…

बाबुराव पाईकराव

        डोंगरकडा

           ९६६५७११५१४