Home Political आळंदी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सुजाता तापकीर बिनविरोध… — स्विकृत सदस्यपदी राहूल चिताळकर...

आळंदी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सुजाता तापकीर बिनविरोध… — स्विकृत सदस्यपदी राहूल चिताळकर पाटील व संदीप रासकर…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आळंदी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी मंगळवारी झालेल्या विशेष सभेत भाजपच्या सुजाता कालिदास तापकीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याच सभेत संदीप मारुती रासकर आणि राहूल चिताळकर पाटील यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड जाहीर करण्यात आली. 

         आळंदी नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे १५ नगरसेवक निवडून आले असून, शिवसेना (शिंदे गट) ४ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे २ नगरसेवक विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपदी भाजपचे प्रशांत कुऱ्हाडे यांची निवड यापूर्वीच झाली आहे. दरम्यान, भाजपकडून माजी उपनगराध्यक्ष सचिन रामदास गिलबिले यांची गटनेतापदी निवड करण्यात आली आहे.

           उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून सुजाता तापकीर यांचे नावे चर्चेत होते. अखेर पक्षाने सुजाता तापकीर यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. भाजपच्या नगरसेवक संख्येनुसार दोन स्वीकृत सदस्यांची शिफारस करण्यात आली. यामध्ये यापूर्वीही स्वीकृत सदस्य राहिलेले संदीप रासकर आणि माजी नगराध्यक्ष राहूल चिताळकर पाटील यांना संधी देण्यात आली. सभेचे पीठासीन अधिकारी व नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी रासकर व चिताळकर पाटील यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले. 

           नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुजाता तापकीर यांनी निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना, “पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचे मी पूर्णपणे ऋण मानते. आळंदी शहराच्या विकासासाठी, विशेषतः पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल. सर्व नगरसेवक, प्रशासन आणि नागरिकांना विश्वासात घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न राहील,” असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आणि मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या हस्ते सुजाता तापकीर यांचा सत्कार करण्यात आला.