कडधान्य, निविष्ठा व अनुदान वाटपाची तक्रारकर्त्यासमक्ष चौकशी करावी… — सोशल फोरम चे उपविभागीय कृषी अधिकारी साकोली यांना निवेदन…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी

        साकोली :- आर्थिक वर्ष २०१९-२० ते २०२१-२२ या कोरोना टाळेबंदी कालावधीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत १०० टक्के प्रात्यक्षिक तथा ५० टक्के अनुदानावर कडधान्य निविष्ठा व बोगस लाभार्थी अनुदान वाटपाची तक्रारकर्ते कैलास गेडाम यांचे समक्ष चौकशी करण्यात यावी. या करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम जिल्हा शाखा भंडारा चे महासचिव कैलास गेडाम यांचे नेतृत्वात उपविभागीय कृषी अधिकारी के.जी. पात्रिकर यांना निवेदन देण्यात आले आहे. 

             कोरोना टाळेबंदी काळात तालुका कृषी अधिकारी साकोली मार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत जांभळी/सडक येथील बोगस लाभार्थ्यांना कडधान्य वाटप व निविष्ठा आणि अनुदान वाटपाची चौकशी करून तत्कालीन कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक व संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करून वितरित केलेली रक्कम वसूल करण्यात यावी.

        या करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम चे जिल्हा महासचिव कैलास गेडाम यांचे नेतृत्वात विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांना १० ऑक्टोबर २०२२ रोजी निवेदन देण्यात आले होते. त्याअनुषंगाने पवनी चे तालुका कृषी अधिकारी आदित्य घोगरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी निवेदनातील मागणी नुसार तक्रारदार यांचे समक्ष चौकशी केली नसल्यामुळे चौकशी अहवाल अमान्य करण्यात आला. तथा १२ सप्टेंबर २०२३ रोजी पुन्हा विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांना निवेदन देण्यात आले. २८ सप्टेंबर २०२३ चे पत्रानुसार उपविभागीय कृषी अधिकारी के.जी. पात्रिकर यांची फेरचौकशीसाठी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

        तक्रारकर्ते कैलास गेडाम यांचे समक्ष चौकशी करावी या करिता उपविभागीय कृषी अधिकारी साकोली यांना निवेदन देण्यात आले आहे. कैलास गेडाम, दादू बडोले, दिलीप कापगते, सुरेश मेश्राम, अरविंद कठाने, सोनू राऊत, प्रमोद शिंगाडे, प्रेमानंद देशपांडे, चंद्रशेखर कापगते, संजय कापगते, चंद्रकांत गहाने यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.