भरकटलेल्या समाजाला वेळीच सावध करणे आवश्यक… — बरबाद करु लागलेत स्वतः बरोबर समाजाचे भविष्य.. — चमकोगिरी आणि मतलबी नेतृत्व दिशाहीन व दुर्भाग्यवश‌‌‌…

 

संपादकीय 

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक 

       ज्या समाजावर अन्याय होतोय त्या समाजाचे शोषण होणे अपेक्षित आहे.अन्याय आणि शोषण सत्ता व्यवस्थेचा एक भाग ठरु लागला असल्याने बहुसंख्य समाजावर वारंवार आघात करणारी मानसिकता पुढे येवू लागली आहे.

            या मानसिकतेला रोखन्यासाठी सर्व स्तरावर यशस्वी प्रयत्न करणे आवश्यक आहे.मात्र,सातत्याने होणारी परवड आर्थिक कोंडी करणारी असल्याने आजच्या काळात पुढे येवून योग्य कार्य करणाऱ्यांची परिस्थिती कठीण व दैना झाली आहे.

         यामुळे शहरी व ग्रामीण भागातील राजकीय नेतृत्व दिशा व कार्य बदलवू लागलेत आणि स्वतः बरोबर समाजाला भरकटत ठेवण्याची मुख्य कारणे ठरु लागलेत.

            म्हणजे,”पक्ष कार्यकर्त्यांच्या हालचाली या दांभीक प्रवृत्तीत बदल्याने, प्रलोभन व लोभाच्या परिभाषान्वय केव्हा त्यांची मने दुर्गतीकडे वळलीत हे त्यांनाही कळण्याच्या पलिकडे झाले आहे.

            प्रलोभनाच्या व लोभाच्या मायाजाळात गुंतलेले मन हे स्वतःला व स्वतःच्या समाजाला सावरण्यासंबंधाने महत्वाचा कार्यभाग पार पाडण्यास सध्यस्थितीत अपयशी ठरु लागले गेले.

        शहरी व ग्रामीण भागातंर्गत सर्व वयातील राजकीय आणि सामाजिक नेतृत्व स्वतः बरोबर समाजाची अस्मिता व अस्तित्व कायम ठेवण्यासाठी धडपडत नाही आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी वैचारिक कार्य क्षमता शिध्द करीत नाही ते नेतृत्व मृत्यूप्राय झालेले असते.

        आंबील पेऊन,घाटा-ढासल-भाकर-चटणी खाऊन आणि प्रसंगी उपवासी राहून अस्मिता व अस्तित्वासाठी संघर्ष करणारा समाज हा नेहमी जागरुक व सतर्क होता.

        मात्र,आताचा सर्व समाज,सर्व प्रकारचे जीवनावश्यक आहार घेवू लागलाय आणि सातत्याने लोकहितार्थ कार्य करणाऱ्या,त्यांच्या अधिकार हक्कासाठी लढणाऱ्या-संघर्ष करणाऱ्या महापुरुषांना व संतांना विसरु लागलाय.तद्वतच स्वतःचा स्वाभिमान,स्वत:ची अस्मिता व स्वतःचे अस्तित्व गमावू लायलाय यापेक्षा त्यांचे दुर्दैव दुसरे नाही.

         जागरुक व सतर्क समाज विविध कार्यक्रमातंर्गत भांडवलशाही आणि शोषण करणाऱ्या व्यवस्थे पुढे किंवा व्यक्तींपुढे कधीच लोटांगण घालत नाही.

           आतातर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावावर मनोरंजन मानसिकतेचा समाज घडविल्या जात आहे व श्रद्धेच्या नावाखाली वैचारिक बंदीस्त समाज तयार केला जात आहे.

           मनोरंजन व वैचारिक बंदीस्त समाजातील नागरिक,तरुण,तरुणी,महिला तर्कसंगत विचार करण्याची बौध्दीक क्षमता गमावून बसतात असे समाजातील चित्र पुढे येवू लागले आहे.याचबरोबर राजकीय क्षेत्रात माना डोलावणारे नेतृत्व समाजाच्या हिताला नाकारणारे असल्याने असे नेतृत्व सर्व समाजासाठी घातक ठरु लागले आहे.

        इस्त्रीचे चमकदार कपडे टाकून नेतागिरीचा टेंभा अनभिज्ञ नागरिकापुढे मिरवणाऱ्यांनी स्वतःचे अस्तित्व केव्हाचे नाकारले आहे,हे तरी चमकदार नेत्यांना कळतय का?

            आता फक्त मागेपुढे करणारी चमकोगिरी नेता कार्यपद्धत शिल्लक राहिल्याने अश्या चमकोगिरी नेत्यांचे समाजहितासाठी राजकारणात व सत्ताकारणात काहीच चालत नाही.

         तकलादू आणि मतलबी नेतागिरी समाजाला विसरत चालली असल्याने सर्व समाजाचे अस्तित्व धोक्यात येवू लागली आहे.

          समता-स्वातंत्र्य-बंधुत्वाला अनुसरून कायदेशीर आणि न्यायीक संघर्ष करणारे ईमानदार नेतृत्व जोपर्यंत राजकीय व सामाजिक क्षेत्रात एकजूटीने आणि शक्तीने उभारुन येत नाही तोपर्यंत ओबीसी,एससी,एसटी,अल्पसंख्याक,विशेष मागासवर्गीय आणि विमुक्त भटक्या जाती-जमातीचे आवश्यक असलेले कल्याण होईल याची चिन्हे दिसत नाहीत.  

          दिशाहीन व भरकटलेले लोक राजकीय आणि सामाजिक नेतृत्व करीत असतील व अश्या नेतृत्वाला सर्व समाजातील नागरिक,”पक्ष व जातीच्या, नावावर चालवून घेत असतील तर हे त्या-त्या समाजातील नागरिकांत व तरुणांत वैचारिक क्षमतेच्या उनिवा आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.दुर्भाग्यवश असे समजावे लागेल की असा समाज ५० वर्षे मागे गेलेला आहे आणि दिशाहीन झालेला आहे.

             बहुजन समाजातील नागरिकांच्या हितासाठी,कल्याणासाठी,त्यांच्या अधिकार हक्कासाठी,त्यांच्या संरक्षणासाठी काहीच केले नाही,अशांच्या मागे बहुजन समाजातील नागरिक,तरुण,तरुणी,महिला शक्ती बनून राहात असतील तर त्यांच्यात भयंकर अज्ञानता भरलेली आहे व ते निर्बुद्ध आहेत असे होते.

           अज्ञानी व निर्बुद्ध नागरिकांना,तरुणांना,तरुणींना,महिलांना,वेळीच सावध करणे गरजेचे आहे व अज्ञानतेतून बाहेर काढणे आवश्यक आहे.पण,असे महत्वपुर्ण कार्य करणार कोण?

              भटकणारे नेतृत्व स्वतःला सांभाळण्याच्या लायकीचे राहात नाही तर ते स्वतःच्या समाजाचे काय भले करणार?व स्वतःच्या समाजाला काय सावरणार?