या विषयावर चिंतन करण्याआधी “धर्म” म्हणजे काय? त्याची व्याख्या पाहू या.
धर्म म्हणजे धारणा, धारण करणे, धर्म म्हणजे मान्यता, धर्म म्हणजे मानणे. एखादी गोष्ट मानणे, एखादा विचार मांडणे, एखाद्या व्यक्तीला मानने म्हणजे त्यावर श्रद्धा ठेवणे होय, त्यावर विश्वास करणे होय.
धर्माची दुसरी व्याख्या, धर्म म्हणजे आचरण. आचरण म्हणजेच वागणूक, कृती. कार्य. आपल्या विचारांची अंमलबजावणी करणे. कृती कार्यक्रम म्हणजेच धर्म होय. आचरण म्हणजे धर्म याचा अर्थ आपल्या वाणीने विचाराने आणि शरीराने आपण जे क्रियाक्रम करीत असतो त्यासच धर्म असे म्हणतात.
धर्माची तिसरी व्याख्या म्हणजे कर्तव्य होय. कर्तव्य याचा अर्थ कार्य किंवा कर्म जरी असले तरी ते केवळ कार्य किंवा कर्म म्हणून न करता स्वतःचे काम म्हणून करणे, तसेच कर्तव्य याचा अर्थ ‘ केलेच पाहिजे ‘ असे काम. केलेच पाहिजे असे काम टाळणे म्हणजे अधर्म होय. उदा. मुलाचे आई-वडिलांबद्दल चे कर्तव्य.
धर्माची व्याख्या केल्यानंतर आता आपण धर्म हा कुणासाठी? म्हणजे धर्माचे लक्षय,धेय्य काय? टार्गेट कोणते? धर्माचा केंद्रबिंदू कोणता आणि कोण ? यावर चिंतन करूया.
धर्म हा देवासाठी आहे की माणसासाठी? धर्माचा मुख्य उद्देश देव आहे की माणूस? धर्माने देवाचे कार्य करायचे आहे की माणसाचे? की दोघांचेही? यावर विचार होणे आवश्यक वाटते.
धर्म हा केवळदेवासाठी असेल, तर देवाला धर्माची खरोखर गरज आहे का? असेल तर कशासाठी? असा प्रश्न पडतो. धर्मपंडित सांगतात की, सारे धर्म देवानेच निर्माण केलेले आहेत, काही धर्माचे धर्मग्रंथ सुद्धा देवानेच निर्माण केलेले आहेत. असे असेल तर मग देवाला धर्माची गरज काय?
देवा शिवाय धर्म नाही आणि धर्माशिवाय देव नाही, असा उपदेश धर्म पंडित करीत असतात. देवासाठी धर्म आहे, म्हणूनच देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी, देवाकडून आपले काही कामे करून घेण्यासाठी, आराधना, प्रार्थना, अनुष्ठान, तीर्थयात्रा, नामस्मरण, पोथी पुराण वाचणे ऐकणे, देवाला अभिषेक करणे, त्याची पूजा करणे, त्याला नवस बोलणे, देवाला द्रव्य दान करणे, नैवेद्य देणे, असे अनेक उपक्रम म्हणजेच क्रियाक्रम म्हणजेच कर्मकांड हे धर्म म्हणून केल्या जाते. आणि यातून देवाचा आणि धर्माचं नातं जवळच आहे हे दाखविल्या जाते. आणि धर्माचा उपयोग माणसा ऐवजी जास्तीत जास्त देवासाठीच केला जातो. नव्हे माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी धर्माच्या नावाने देवाचा वापर करीत असतो. कारण माणूस हा मूळतः स्वार्थी आहे. स्वार्थी माणूस देवाचा आणि धर्माचा दोन्हीचाही स्वतःच्या पायऱ्यासाठी वापर करीत असतो. ना तो देव मानतो ना तो धर्म मानतो. व्यवहारात जरी या कर्मकांडातून कसे दिखाऊ कारे दिसत असले तरी उद्देश मात्र स्वार्थी असल्यामुळे तो देवही मानत नाही आणि धर्मही मानत नाही. जेव्हा देवाचा आणि धर्माचा उपयोग स्वार्थासाठी होतो तेव्हा तिथे देव आणि धर्म नसतोच .
खरे तर धर्म हा माणसासाठीच असला पाहिजे, कारण देवानेच धर्माची निर्मिती केली असल्यामुळे देवाला धर्माची गरज नाही तर माणसाला धर्माची गरज आहे, असे पण धर्मपंडित सांगत असतात, असे सांगताना नीती, नैतिकता, नीतिमत्ता, नीतीमूल्य ही जोपासली पाहिजेत. असे पण सांगता त. परंतु याचे पालन मात्र कुणीही करताना दिसत नाही. कर्तव्य म्हणजे धर्म असेही सांगत असतात, तेही करताना कोणी दिसत नाही. आपली नित्य कर्म म्हणजेच धर्म ते इमाने इतवारी केली पाहिजेत ते पण माणसे करताना दिसत नाहीत, केवळ पाट्या टाकायचे काम करतात. आपल्याला नेमून दिलेले कार्य इमाने इतवारी करायला पाहिजे ते करत नाहीत तर केवळ टाळाटाळ करतात, कोणतेही कर्मचारी मन लावून दिवसभर आपल्या खुर्चीत बसून काम करताना दिसत नाहीत, कर्तव्य करीत नाहीत, ज्यांच्यासाठी ते आहेत त्यांनाच ते माहीत नाहीत, शेतातील मजुरांचे असेच आहे. कारखान्यातील कामगारांचे असेच आहे. बस मधील ड्रायव्हर आणि कंडक्टरचेही प्रवाशांसोबतची वागणूक पाहिली तर असेच दिसते. सगळीकडेच कर्तव्य या भावनेने कोणीच आपली ड्युटी करताना दिसत नाहीत, म्हणून कर्तव्य म्हणजेच धर्म अशी व्याख्या जर असेल तर याचा अर्थ की कुणीच धर्म पाळत नाही. केवळ पोटासाठी नाईलाज म्हणून पाट्या टाकायचे काम चालू आहे.
नीतिमत्ता आणि नैतिकता हा धर्माचा जर मुख्य उद्देश असेल तर, समाज स्वास्थ्य बिघडू नये म्हणून, समाजानेच निर्माण केलेले कायदे कानून म्हणजेच नीती नियम होत, हे नितीन नेम तरी लोक पाळतात का? पाळत नाहीत, याला अनेक कारणे आहेत, भौतिक आणि मानसिक कारणे आहेत. ते शोधल्याशिवाय नैतिकता म्हणजे धर्म अशी व्याख्या करता येणार नाही. काहीही असले तरी शेवटी धर्म हा देवासाठी नसून माणसासाठीच निर्माण झालेला आहे, हे विसरून चालणार नाही. धर्माचे नाते देवाशी न जोडता, माणसाशीच जोडले पाहिजे, तरच समाज स्वास्थ्य टिकेल किंवा धर्म हा माणसाच्या उपयोगाचा ठरेल, अन्यथा धर्म म्हणजे ‘ असून अडचण आणि नसून खोळंबा ‘ असे होईल.
महाराज लोक धर्माबद्दल सांगताना कीर्तनातून, कथा, भजनातून धर्माबद्दल बोलत असताना धर्म हा देवासाठी पण केला पाहिजे आणि धर्म माणसांनी स्वतः पाळला पाहिजे तो स्वतःच्या हितासाठीच. असे सांगत असतात. म्हणजेच धर्म हा देवासाठी जसा आहे तसा माणसासाठी पण आहे. म्हणून धर्म माणसांनी देव प्राप्त करून घेण्यासाठी आणि स्वतःचे हित साधण्यासाठी पाळणे जरुरीची आहे, असा उपदेश करीत असतात. ईश्वर प्राप्ती कशासाठी? त अहंकार नष्ट होण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी. मोक्ष याचा अर्थ माणसातील विकृती नष्ट करण्यासाठी म्हणून धर्माची आवश्यकता आहे. असे महाराज सांगतात. खरे तर विकृती दूर करण्यासाठी नैतिकतेची गरज असते, तिथे देवाची काय आवश्यकता? हेच समजत नाही. देवाचा आणि मोक्षाचा काय संबंध? देव प्राप्त झाला तरच मोठी मिळतो, अन्यथा नाही, असे म्हणणे चुकीचे आहे, कारण माणसातील षड रिपु म्हणजे सहा शत्रू, म्हणजे विकृती, म्हणजेच राग मान माया लोभ द्वेष मत्सर गर्व अभिमान हे शत्रू घालवायचे असल्यास, नैतिकतेची गरज आहे, आणि नैतिकतेने वागण्यासाठी माणसाचा दृढ संकल्प आवश्यक आहे, हे सत्य असेल तर मग मोक्षासाठी देवाची गरज काय? असा साधा सरळ प्रश्न आहे पडतो. देवाचा धर्म आणि धर्माची देवळे, या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे म्हटल्याप्रमाणे देवळात देव नसतो तर तुझ्या पुजाऱ्याचे पोट असते. अशावेळी धर्म हा पुरोहित लोकांचा एक व्यवसायच होऊन बसतो. जे श्रम न करता ऐतखाऊ प्रवृती जोपासतात.
थोडक्यात, देव आणि धर्म मानणाऱ्या लोकांसाठी असे सांगावेसे वाटते की, तुमच्याच विचारानुसार जर देवानेच धर्म निर्माण केला असेल तर देवाला धर्माची गरज नाही, आणि दुष्ट प्रवृत्ती नष्ट करणे ही नैतिकता म्हणून मुख्य असा विचार असेल तर धर्माची गरज ही माणसाला आहे, देवाला नाही. म्हणून धर्माचा केंद्रबिंदू हा माणूस असला पाहिजे, देव नको.
देवाच्या आणि धर्माच्या नावाने आणि कर्मकांडामुळे बहुजन आणि श्रम करावे घाम गाळावे आपलं आयुष्य चार पैसे मिळवण्यासाठी घालवावं, आणि कष्टाचा पैसा आयत खाऊ लोकांसाठी खर्च करावा, ही कसली नीतिमत्ता? ही कसले नैतिकता? हा कसला धर्म?
देवासाठी आणि धर्मासाठी आज लोक आपला अमूल्य वेळ आणि पैसा अनाठ आहे खर्ची घालत आहेत, खरे तर देवा धर्माच्या नावाने चाललेले नव्हे स्वार्थी लोकांनी चालविलेले आणि केलेले हे आर्थिक शोषण होय. या शोषणातून बहुजन समाजाने मुक्त होण्याची खरी गरज आहे.



