स्वार्थ आणि मोह या दोन्हीपण माणसाच्या नैसर्गिक प्रेरणा आहेत.जनावर आणि माणसातील फरक म्हणजे जनावरांना स्वार्थ असतो,पण मोह नसतो.
आपली गरज भागली की,तिथेच तो थांबतो.परंतु माणूस गरज भागल्या नंतरही त्याची अपेक्षा पूर्ण होत नसते.त्याच्या अपेक्षाला मर्यादा नसते.अमर्याद अपेक्षा , अतीस्वार्थ म्हणजेच लोभ मोह होय.
जनावरास मोहाची प्रेरणा नसते.शिकार करून आपले पोट भरले की,उरलेल्याची अपेक्षा करीत नाही की साठवून ठेवीत नाही.साठेबाजी काळाबाजार म्हणजे काय ? हे जनावरास माहित नसते.या गोष्टी त्याच्या विचार विश्वात नसतात.
लैंगिक भुकेचे पण असेच आहे.ती शमली की,त्या मादीवर हक्क अधिकार गाजवित नाही.आपलीच होऊन राहिली पाहिजे,इतरांचा तिच्यावर अधिकार असता कामा नये,हा विचार जनावरात नसतो.कारण गरजेपुरताच स्वार्थ असतो.तो संपला की,त्याचा स्वार्थ शिल्लकच राहत नाही.
मानवाचे अगदी याविरुद्ध आहे.आपली पोटाची भूक भागली,लैंगिक भूक भागली तरीही अजून पुढची अपेक्षा करतो.तिथेच ती अपेक्षा विसरून जात नाही.पुढील तरतूद म्हणून उपभोगाच्या ज्या वस्तू आहेत,उपभोगाची जी साधने आहेत,( स्त्री सहित ) ती कायमची आपली असावीत,त्यावर आपली मालकी असावी,म्हणून हक्क आणि अधिकाराचा कायदा माणसांनी बनविला.
स्वातंत्र्याचा हक्कास संकुचित केले.स्वातंत्र्यास स्वैराचार असे नाव ठेऊन मर्यादित स्वातंत्र्य म्हणजेच खरे स्वातंत्र्य,अशी आपल्या सोयीची व्याख्या केली.खरे तर साधने,वस्तू, स्त्री,गुलाम,नोकर हे वापरायचे साधन जरी असले,उपभोगाची साधने जरी असली,तरी त्यांना आपल्या कायम ताब्यात ठेवणे म्हणजे त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेणे,त्यांचेवर अन्याय करणेच आहे.
त्यांना समतेची वागणूक न देण्याचा हा प्रकार आहे.हा विचार,ही व्यवस्था,असे कायदे म्हणजे मोहाचे प्रदर्शन करणे होय.
लोभ मोह हे सद्गुण नसून दुर्गुण आहेत,संस्कृती नसून विकृतीचा प्रकार आहे.म्हणून संत महात्मे महामानवांनी,बुद्धाने आशा,आशेतून स्वार्थ,स्वार्थातून मोह,लोभ निर्माण होतो,आणि हा मोह सगळ्यांसाठीच शाप ठरतो.सार्वजनिक जीवन,वैयक्तिक जीवन सुद्धा बिघडून टाकते.
मोहामुळेच माणूस अहंकारी गर्विष्ठ बनतो.गर्वामुळे माणूस इतरांवर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतो,सत्ता निर्माण करतो. अधिकार गाजवतो,हुकुमशाही प्रवृती त्याचेत निर्माण होते.कोणत्याही साधनांचा ( जमीन ,संपती,सोने, हिरे ) यांचा मोह होतो,स्त्रीचा मोह होतो,म्हणूनच या सर्व गोष्टी मिळवण्याचा त्या साठवण्याचा,त्या आपल्या अधिकारात राहण्याचा प्रयत्न करतो.
सहजासहजी हे शक्य होत नसेल तर चोऱ्या,मारामाऱ्या,दरोडा,खून अशा गोष्टी करायला लागतो. हे सारे मोह लोभ यामुळे घडत असते.लोभ मोह या तर नैसर्गिक प्रेरणा आहेत.यावर सुधार वादी,उपदेशात्मक कितीही प्रयत्न केले तरी मोह काही आवरत नाही.
युद्धे झाल्याशिवाय राहत नाहीत.याचे कारण जगातील विषमतेची आर्थिक व्यवस्था.वर्गीय व्यवस्था हे कारण आहे.जो पर्यंत मालकी हक्क संपुष्टात येऊन सार्वजनिक हक्क प्रस्थापित होणार नाही,तो पर्यंत युद्धे,मारामाऱ्या,चोऱ्या,भ्रष्टाचार, स्त्री दास्य नाहीसे होणार नाही.
अन्न पाणी,हवा,तयार माणसाच्या मूलभूत गरजा आणि वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या आवश्यक गरजा आहेत,यासाठी केलेला स्वार्थ क्षम्य आहे.ठीक आहे.असा स्वार्थ सुद्धा निसर्गाची प्रेरणाच आहे.परंतु यापुढचा स्वार्थ म्हणजे अतिस्वार्थ,म्हणजेच मोह लोभ होय.
लोभ मोहाला जेंव्हा कायदेशीर स्वरूप येते,तेंव्हा व्यवस्था बिघडते.विषमता प्रस्थापित होते.
मानव असो की जनावर,दोघेही जीवन जगण्यासाठी धडपड करीत असतात.जीवन जगण्याची म्हणजे अस्तित्वाची लढाई यांना रोजच लढावी लागते.’ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग ‘ तुकाराम महाराज सुद्धा म्हणाले.अस्तित्वाची लढाई लढणे चुकीचे नाही.योग्यच आहे.परंतु लोभासाठी ची लढाई चुकीची आहे.कारण ही लढाई समस्या दूर करण्यासाठी नसते,तर अनेक समस्यांना जन्म देते.



