Home Maharashtra चिमूर तालुक्यातील निराधार,अपंग व विधवा लाभार्थ्यांना मानधनाची प्रतीक्षा….  — दर महिन्याच्या...

चिमूर तालुक्यातील निराधार,अपंग व विधवा लाभार्थ्यांना मानधनाची प्रतीक्षा….  — दर महिन्याच्या १ तारखेला नियमित मानधन देण्याची प्रशासक उपसरपंच अशोक चौधरी यांची मागणी…

शुभम गजभिये

 विशेष प्रतिनिधी

        चिमूर तालुक्यातील अनेक निराधार,अपंग,विधवा तसेच विविध शासकीय योजनांतील पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारे मानधन वेळेवर मिळत नसल्यामुळे,त्यांना मोठ्या आर्थिक व मानसिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

         शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा मुख्य उद्देश समाजातील दुर्बल व गरजू घटकांना आर्थिक आधार देणे हा असला तरी प्रत्यक्षात अनेक लाभार्थी मानधनापासून वंचित राहत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.

       ग्रामीण भागातील अनेक निराधार,अपंग व विधवा व्यक्तींचा उदरनिर्वाह हा शासनाकडून मिळणाऱ्या या मानधनावरच अवलंबून असतो.औषधोपचार,अन्नधान्य,घरगुती खर्च तसेच दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांना या मदतीची अत्यंत आवश्यकता असते. 

       मात्र,मानधन वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांचे जीवन अधिकच कठीण होत आहे.विशेषतः ज्येष्ठ नागरिक,अपंग व्यक्ती व निराधार महिलांना आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

        काही लाभार्थ्यांना अनेक महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही,तर काहींना अनियमितपणे मानधन मिळत असल्याने त्यांना आर्थिक नियोजन करणे कठीण होत आहे.

ठळक मुद्दे….

१) चिमूर तालुक्यातील निराधार,अपंग व विधवा लाभार्थ्यांना मानधन वेळेवर मिळत नाही.

२) अनेक लाभार्थ्यांचे मानधन महिनोनमहिने प्रलंबित असल्याची तक्रार.

३) औषधोपचार,अन्नधान्य व दैनंदिन खर्च भागविण्यात लाभार्थ्यांना अडचणी.

४) शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा उद्देश अपूर्ण राहण्याची भीती.

५) दर महिन्याच्या १ तारखेला नियमित मानधन देण्याची मागणी.

६) प्रलंबित मानधन तात्काळ देण्याची प्रशासनाकडे मागणी.

      यासाठी संबंधित प्रशासन व शासनाने तात्काळ कार्यवाही करून चिमूर तालुक्यातील सर्व निराधार,अपंग,विधवा व इतर पात्र लाभार्थ्यांना त्यांचे मानधन दर महिन्याच्या एक तारखेला नियमितपणे देण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याबाबतची मागणी चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील शंकरपूर ग्रामपंचायतीचे प्रशासक उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली आहे. 

       तसेच ज्या लाभार्थ्यांचे मानधन प्रलंबित आहे ते त्वरित देण्यात यावे,अशीही मागणी त्यांनी केली आहे.समाजातील दुर्बल व गरजू घटकांचा विचार करून शासनाने या प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा प्रशासक उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी व्यक्त केली आहे…