Home Maharashtra मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करू नका! — प्रदेश...

मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करू नका! — प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका.

दिक्षा कऱ्हाडे

वृत्त संपादिका

      पुणे :- राज्य सरकारने परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या अस्मितेला बळ देणारा आणि मराठी भाषेच्या सन्मानासाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

          असे असतांना हातावर पोट असलेल्यांना मराठी जरूर शिकवली पाहिजे मात्र,त्यांचे परवाने रद्द करणे योग्य नाही, अशा शब्दात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी मंगळवारी (ता.२८) पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

          महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा लिहिता,वाचता आणि बोलता येणे अत्यावश्यक आहे.महाराष्ट्र ही संत,समाजसुधारक आणि मराठी संस्कृतीची भूमी असून येथे राहणाऱ्या आणि उपजीविका करणाऱ्या नागरिकांनी स्थानिक भाषेचा आदर राखला पाहिजे. 

        परंतु,राज्य सरकारने १ मे पासून मराठी भाषा बोलता न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांचे थेट परवाना रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य नाही,असे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले.

          परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला इशारा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली स्पष्ट भूमिका ही राज्याच्या भाषिक धोरणाची ठाम दिशा दर्शवणारी आहे.भाजपकडून मराठी शिकवणी वर्ग सुरू करून रिक्षा चालकांना भाषा शिकवण्याचा उपक्रम राबविणे हे देखील कौतुकास्पद आहे. आरपीआय देखील रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे धडे देईल, असे डॉ.चलवादी म्हणाले.

         दुसऱ्या राज्यात जाऊन व्यवसाय करताना तेथील भाषा आत्मसात करणे आवश्यक असते,त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही मराठी भाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे.केवळ परिवहन क्षेत्रातीलच नव्हे तर राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील व्यवसायिकांना मराठी यायलाच हवी. मात्र, असे करतांना त्यांचे व्यावसायिक परवाने रद्द करण्याची अट जाचक ठरू नये, असे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले. राज्यातील जवळपास ८० टक्के परप्रांतियांना मराठी येते,ज्यांना येत नाही त्यांनी मराठी शिकली पाहिजे,अशी स्पष्ट भूमिका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

        राज्य सरकारच्या या निर्णयाचे आरपीआय (आठवले) अंशत: समर्थन करत असून मराठी भाषेच्या गौरवासाठी हा निर्णय प्रभावी ठरेल,असा विश्वासही डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे मूळचे कर्नाटकचे असताना देखील डॉ.चलवादी यांच्या मराठी भाषेवरील प्रभुत्वाची मा.रामदास आठवले साहेबांनी स्तुती केली होती.