दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सदगुरु मारोतीबोवा गुरव आळंदीकर यांच्या ८२ व्या पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधुन समस्त गुरव परिवार व आळंदीकर ग्रामस्थ यांच्या वतीने सदगुरु मारोतीबोवा गुरव यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आळंदी भुषण वारकरी पुरस्कार वेदांत सत्संग समितीचे डॉ.नारायण महाराज जाधव यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, माजी सभापती डि.डि.भोसले पाटील, भाजपा नेते डॉ.राम गावडे, भाजपा शहराध्यक्ष किरण येळवंडे, विलास वाघमारे, अनिल वाघमारे, ज्ञानेश्वर जाधव, विश्वंभर पाटील, संकेत वाघमारे उपस्थित होते.
डॉ.नारायण महाराज जाधव मुळचे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कर्जुले हरिया येथील रहिवाशी आहेत. घरात वारकरी संप्रदायाचा वारसा असल्याने त्यांची पावले आळंदीकडे अध्ययनासाठी वळाली येथे आल्यानंतर सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत संत साहित्याचा अभ्यास सुरू केला.
आळंदीतील गोपाळपुरा येथे केवल्य आश्रमामधील आनंदस्वामी ऊर्फ दन्तेस्वामी यांच्याकडे बरेच वर्षे राहून वारकरी पद्धतीचे शिक्षण घेतले. एकनाथी भागवत, विचारसागर, ज्ञानेश्वरी, वृत्तीप्रभाकर, पंचदशी अशा अनेक ग्रंथांवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांनी वारकरी शिक्षण देणारी संस्था आळंदीत उभी करून शेकडो कीर्तनकार, प्रवचनकार, साधकांना घडविण्याचे काम केले आहे.



